तेहरान,
Iranian President's Resignation इराणच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणारी घटना समोर आली असून राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेसोबतच्या संबंधांबाबत सुरू असलेल्या संवेदनशील घडामोडी आणि देशांतर्गत सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सर्वोच्च नेतृत्वाला पाठविलेल्या पत्रात पेझेश्कियन यांनी देशाच्या प्रशासनिक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारची निर्णयक्षमता कमकुवत झाल्याचा दावा केला आहे. राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी राष्ट्राध्यक्ष आणि निवडून आलेल्या सरकारला महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांपासून दूर ठेवले जात असल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय विषयांवर निर्णय घेताना अधिकृत सरकारी यंत्रणेला डावलले जात असून काही शक्तिशाली संस्थांचा प्रभाव वाढत चालला आहे.

त्यामुळे लोकशाही प्रक्रियेला धक्का बसत असल्याचे त्यांनी नमूद केले. पेझेश्कियन यांनी विशेषतः इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) च्या वाढत्या हस्तक्षेपावर बोट ठेवत प्रशासनातील संतुलन बिघडल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही महिन्यांत सरकार आणि सुरक्षा यंत्रणांमधील मतभेद तीव्र झाल्याचेही त्यांनी सूचित केले. या परिस्थितीमुळे सरकारला अनेक धोरणात्मक निर्णय प्रभावीपणे राबवता आले नाहीत, तसेच परराष्ट्र धोरणाशी संबंधित काही महत्त्वाच्या उपक्रमांनाही अडथळे निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा अधिकच महत्त्वाचा मानला जात आहे. देशातील सत्ताकेंद्रांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे भविष्यातील राजकीय घडामोडींवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे. सर्वोच्च नेतृत्वाने हा राजीनामा स्वीकारला आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घडामोडीमुळे इराणच्या अंतर्गत राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत परिस्थिती कोणते वळण घेते याकडे जगाचे लक्ष लागले आहे.