नवी दिल्ली,
JEE Advanced 2026 Results देशातील प्रतिष्ठित आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला असून लाखो विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. यंदाच्या निकालात दिल्ली झोनच्या विद्यार्थ्यांनी विशेष छाप पाडली असून देशातील पहिल्या तीन क्रमांकांवर त्यांचाच दबदबा पाहायला मिळाला आहे.या वर्षी परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे होती. निकाल जाहीर होताच देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यंदा शुभम कुमारने अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत सर्वोच्च यश मिळवले. त्याचप्रमाणे कबीर चिल्लरने दुसरा, तर जतैन चहरने तिसरा क्रमांक मिळवत दिल्ली झोनची ताकद अधोरेखित केली.
मुलींच्या गटातही उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली. आरोही देशपांडे हिने महिला उमेदवारांमध्ये अव्वल स्थान मिळवत विशेष लक्ष वेधून घेतले. तिच्या यशामुळे देशभरातील अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थिनींना नवी प्रेरणा मिळाली आहे.यंदाच्या परीक्षेसाठी देशभरातून १.८७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे १.७९ लाख उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला बसले. कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत एकूण ५६,८८० विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून त्यामध्ये १०,१०७ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ परीक्षा १७ मे रोजी दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. सकाळी आणि दुपारी असे दोन स्वतंत्र पेपर आयोजित करण्यात आले होते. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना दोन्ही पेपरमधील गुणांचा विचार करण्यात आला. निकालानंतर आता यशस्वी विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे. पुढील टप्प्यात जॉइंट सीट ॲलोकेशन अथॉरिटी मार्फत समुपदेशन प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि पसंतीनुसार आयआयटी तसेच इतर सहभागी संस्थांमधील अभ्यासक्रम निवडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे निकालानंतर आता देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठीची स्पर्धा आणखी रंगणार आहे.