कल्याणमध्यै 'सैराटची' पुनरावृति

पित्याकडून विवाहित मुलीची हत्या

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
मुंबई
Kalyan honor killing case, कल्याण पश्चिमेतील पारेकरवाडी परिसरातील रचना रॉयल इमारतीत घडलेल्या मुलीच्या हत्येच्या प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन दिवसांपासून फरार असलेल्या आरोपी वडिलांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले. मुलीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
 

Kalyan honor killing case, 
विवाहित मुलीला क्रूरपणे संपवले
पोलिसांच्या माहितीनुसार, विनोद वसईकर यांनी आपल्या विवाहित मुलगी गायत्री वसईकर हिची धारदार शस्त्राने हत्या केली होती. गायत्री लग्नानंतर काही दिवसांसाठी माहेरी आली होती. याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. हत्येनंतर विनोद वसईकर घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत अखेर पोलिसांनी विनोद वसईकर यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले.
 
 
प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, गायत्रीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन इतर जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला तिच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. मुलीसाठी त्यांनी यापूर्वी दोन वेळा साखरपुड्याची तयारी केली होती, मात्र गायत्रीने ते प्रस्ताव नाकारले होते. त्यानंतर तिने स्वतःच्या पसंतीने प्रेमविवाह केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर वडील आणि मुलगी यांच्यात याच विषयावरून पुन्हा वाद झाला. हा वाद हळूहळू तीव्र होत गेला आणि संतापाच्या भरात विनोद वसईकर यांनी धारदार शस्त्राने गायत्रीवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गायत्रीचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी वडील फरार झाले होते. मात्र पोलिसांनी तीन दिवसांच्या अथक शोधमोहीमेनंतर त्यांना अटक केली. चौकशीदरम्यान मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातूनच आपण हे कृत्य केल्याची कबुली त्यांनी दिल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत असून आरोपी विनोद वसईकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.