नागपूर,
Mahakumbh of ITI Directors महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना, नागपूर विभागाच्या वतीने आयोजित भव्य विभागीय मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून सुमारे ४०० निदेशक, प्रशिक्षक आणि सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनात्मक ऐक्याचे दर्शन घडविले.
मेळाव्याचे उद्घाटन शिक्षक आ. सुधाकर अडबाले यांच्या हस्ते झाले. संघटनेचे मुख्य मार्गदर्शक तथा माजी सरचिटणीस भोजराज काळे अध्यक्षस्थानी होते, तर पदवीधर शिक्षक आ. अभिजित वंजारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातील विविध अधिकारी, संघटनेचे राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणीने एका वर्षात केलेल्या कार्याचा आढावा सभासदांपर्यंत पोहोचविणे आणि आयटीआय संवर्गाच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधणे हे मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्ट होते.
उद्घाटक आ. सुधाकर अडबाले यांनी कौशल्य विकास क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षकांना आवश्यक सुविधा, प्रशिक्षण साहित्य आणि स्वायत्तता मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. आ. अभिजित वंजारी यांनी आयटीआय संवर्गाच्या समस्या विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन दिले. “आयटीआय निदेशक संघटना ही समाजाला कौशल्यसंपन्न मनुष्यबळ घडविणारी महत्त्वाची संघटना आहे,” असे त्यांनी नमूद केले.
Mahakumbh of ITI Directors अध्यक्षीय भाषणात भोजराज काळे यांनी संघटनेच्या प्रवासाचा आढावा घेत सभासद व प्रशासन यांच्यातील समन्वय अधोरेखित केला. सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.
उत्कृष्ट नियोजन, पदाधिकाऱ्यांचे सहकार्य आणि निदेशक बंधू-भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा मेळावा संघटनात्मक एकजूट, विचारमंथन आणि आयटीआय संवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरला.