मोठा बदल! रत्नागिरी बस स्थानकाचा पॅटर्न राज्यभर राबविण्याचा निर्णय

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
रत्नागिरी
MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) रत्नागिरी बस स्थानकाच्या धर्तीवर आता संपूर्ण राज्यात प्रवासी सेवेचा नवा नमुना लागू केला जाणार असून, “आपली बस, आपली सेवा” हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
 


MSRTC 
रत्नागिरी बस स्थानकाची पाहणी करताना आणि तेथील सुविधांचा आढावा घेताना मंत्री सरनाईक यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. एसटीची सेवा अधिक शिस्तबद्ध, प्रवासी-केंद्रित आणि आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या उपक्रमांतर्गत एसटी सेवेचा संपूर्ण ढाचा प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देऊन पुनर्रचित केला जाणार आहे. बस स्थानकांवरील स्वच्छता, वेळेचे पालन, कर्मचाऱ्यांचे शिस्तबद्ध वर्तन आणि प्रवाशांशी सौहार्दपूर्ण संवाद यावर विशेष भर दिला जाणार आहे. चालक व वाहक हे केवळ कर्मचारी न राहता ‘सेवक’ म्हणून काम करतील, असा दृष्टिकोन या नव्या धोरणामागे असल्याचे सांगण्यात आले.बस सुटण्यापूर्वी चालकांनी प्रवाशांना मार्ग, थांबे आणि प्रवासाचा अंदाजित कालावधी याची माहिती देणे बंधनकारक करण्याची शक्यता असून, प्रवाशांशी थेट संवाद वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार असल्याची माहितीही मंत्री सरनाईक यांनी दिली.याशिवाय, बस स्थानके आणि परिसर अधिक स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार असून, प्रवाशांनाही स्वच्छता राखणे आणि डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्ड आणि ऑनलाइन आरक्षण प्रणालीचा वापर वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत MSRTC प्रवाशांना तातडीने पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. प्रवासी सेवा अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक करण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.“आपली बस, आपली सेवा” हा उपक्रम केवळ प्रशासकीय सुधारणा नसून प्रवासी आणि एसटी यांच्यातील विश्वासाचा नवा सेतू ठरेल, असा विश्वास व्यक्त करत या योजनेमुळे एसटी प्रवास अधिक सुरक्षित, सुखकर आणि आधुनिक होईल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांमध्ये हा उपक्रम टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार असून, रत्नागिरीतून सुरू झालेली ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रातील प्रवासी सेवेचा नवा आदर्श ठरू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.