नाशिक ,
Nashik MLC election नाशिक येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशीही महाविकास आघाडीकडून नाशिकमधील जागेसाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याने आघाडी निवडणुकीतून माघार घेण्याच्या शक्यतेवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून या घडामोडींवर तातडीने भूमिका स्पष्ट करण्यासाठी दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. नाशिक विधान परिषद जागेसाठी ठाकरे गटातील वसंत गिते आणि अनिल कदम हे इच्छुक असतानाही अद्याप उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने संभ्रम अधिक वाढला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या निवडणुकीतून माघार घेणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.या पार्श्वभूमीवर, जर आघाडीने प्रत्यक्षात निवडणुकीतून माघार घेतली तर नगरसेवकांची मतांची दिशा कोणत्या बाजूने वळणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर या निर्णयाचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, महायुतीतही अंतर्गत Nashik MLC election अस्वस्थता वाढताना दिसत आहे. नाशिकमधील ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्यामुळे भाजपमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. भाजपकडून अपेक्षित उमेदवारी न मिळाल्याने गणेश गीते यांनी बंडखोरी करत स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालय गाठल्याची माहिती समोर आली आहे.या बंडखोरीमुळे महायुतीच्या गणितात गुंतागुंत वाढली असून शिवसेना शिंदे गटासाठी ही परिस्थिती आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत. एकीकडे महाविकास आघाडीची भूमिका अस्पष्ट असताना, दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत संघर्षामुळे नाशिकमधील विधान परिषद निवडणूक अधिक चुरशीची आणि अनिश्चित बनली आहे.निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी घडणाऱ्या या राजकीय हालचालींमुळे सर्वच पक्षांचे रणनीतिक गणित बदलण्याची शक्यता असून आज होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.