पुणे
NCP Pune राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून मोठा अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. पक्षात ऐनवेळी प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने दीर्घकाळापासून पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे पक्षांतर्गत गटबाजी उघड झाली असून शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि कोकण या दोन जागा मिळाल्या आहेत. कोकण मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना पुण्यातील उमेदवारीवरून मात्र पक्षात मोठा गोंधळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने सकाळी जिजाई बंगल्यावर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीत अनेक इच्छुकांनी उमेदवारीची जोरदार मागणी केली होती.मात्र, सर्व स्थानिक आणि दीर्घकाळ काम करणाऱ्या इच्छुकांना बाजूला ठेवत ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या निर्णयाला पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. तरीही नेतृत्वाने हा निर्णय कायम ठेवल्याने असंतोष अधिकच वाढल्याचे चित्र आहे.उमेदवारी जाहीर होताच पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी उघड नाराजी व्यक्त करत थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली. त्यांच्या या भूमिकेला माजी पदाधिकारी रामदास गाडे यांनी पाठिंबा देत पक्षातील सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या घडामोडींमुळे पक्षात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले NCP Pune आहे.दुसरीकडे, सुरेश घोले यांनीही उमेदवारी न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपण अनेक वर्षे पक्षासाठी काम केले असून वरिष्ठ पदांवर जबाबदाऱ्या पार पाडल्या, तरीही उमेदवारी डावलण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी लवकरच नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
या संपूर्ण घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र झाला असून निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत आहे. पुण्यात उमेदवारीवरून निर्माण झालेल्या या राजकीय नाट्याचा आगामी निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षातील नाराजी कशी दूर केली जाते आणि बंडखोरी थांबवण्यासाठी नेतृत्व कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.