‘तो' ड्रेस घालावाच लागेल!

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
मुंबई
Nehal Wadoliya ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि ‘गंदी बात’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री नेहल वडोलिया सध्या तिच्या एका पॉडकास्ट मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. पॉडकास्टमध्ये बोलताना तिने तिच्या करिअरमधील काही अनुभव तसेच वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही बाबींवर भाष्य केले. यावेळी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत काम करतानाच्या अनुभवांविषयी बोलताना ती भावूक झाल्याचे दिसून आले.
 

Nehal Wadoliya 
नेहलने दावा केला की, मालिकेतील एका भागाच्या चित्रीकरणादरम्यान तिला स्वतःच्या पसंतीविरुद्ध पोशाख परिधान करण्यास सांगण्यात आले होते. ती त्या पोशाखात अस्वस्थ असल्याचे सांगूनही तिला तोच ड्रेस घालण्यास सांगण्यात आल्याचा आरोप तिने केला. तिच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला तिला स्वतःचे कपडे घरून आणण्यास सांगण्यात आले होते. मात्र, सेटवर पोहोचल्यानंतर मुख्य अभिनेत्रीचा पोशाख आणि तिचा पोशाख एकसारखा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तिला दुसरा पोशाख देण्यात आला, परंतु त्या पोशाखात ती सहज वाटत नसल्याचे तिने सांगितले.
 
 
“त्या काळात मी कोणतेही बोल्ड Nehal Wadoliya  प्रोजेक्ट केले नव्हते. त्यामुळे दिलेल्या ड्रेसमध्ये मी कम्फर्टेबल नव्हते. मी त्याबाबत आक्षेप घेतला होता, मात्र मला तोच ड्रेस परिधान करावा लागेल, असे सांगण्यात आले,” असे नेहलने मुलाखतीत नमूद केले. छोट्या किंवा कॅमिओ भूमिका करणाऱ्या कलाकारांना अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळते, असा दावाही तिने यावेळी केला.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नेहलने बबिताच्या मैत्रिणीची छोटी भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर तिला ‘गंदी बात’ या मालिकेची ऑफर मिळाली आणि त्यानंतर तिने दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करणे जवळपास बंद केल्याचे तिने सांगितले. मालिकेत काम करण्याचा एकूण अनुभव चांगला असला, तरी काही प्रसंगांमध्ये कलाकारांशी होणाऱ्या वागणुकीबाबत तिने नाराजी व्यक्त केली.नेहल वडोलियाच्या या दाव्यांमुळे मनोरंजन क्षेत्रात पुन्हा एकदा कलाकारांच्या कामाच्या परिस्थिती आणि सेटवरील वागणुकीबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, तिच्या आरोपांवर संबंधित निर्माते, कलाकार किंवा मालिकेशी संबंधित अन्य व्यक्तींकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.