90 दिवसांचे बनावट कामगार प्रमाणपत्र देणारे रडारवर

नागपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई दोन ऑनलाईन केंद्रांवर छापे!

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
नागपूर
Nagpur Police बांधकाम कामगारांच्या सरकारी योजनांचा गैरफायदा घेण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांचा आधार घेणाèया टोळीचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. प्रत्यक्षात बांधकाम क्षेत्रात एकही दिवस काम न केलेल्या व्यक्तींना, 90 दिवस काम केल्याचे बनावट दाखले देऊन शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर ग्रामीण जिल्ह्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे बनावट कागदपत्रे तयार करणाèयांमध्ये आणि ऑनलाईन केंद्र चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
 
police
 
Nagpur Police महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित कामगाराने बांधकाम क्षेत्रात किमान 90 दिवस काम केल्याचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. ही प्रमाणपत्रे अधिकृत ठेकेदारांमार्फत दिली जातात. मात्र, काही ठेकेदार आणि ऑनलाईन सेवा केंद्रचालकांनी संगनमत करून, प्रत्यक्षात काम न केलेल्या व्यक्तींना बनावट प्रमाणपत्रे तयार करून दिल्याचे उघडकीस आले. मंडळाच्या योजनांमध्ये गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत अपर कामगार आयुक्तांच्या निर्देशानुसार विशेष दक्षता पथके स्थापन करून विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शासनाची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.