पुणे
water problem विश्रांतवाडी परिसरातील वडार वस्ती क्रमांक ११२, भीमनगर, शांतीबन सोसायटी तसेच आसपासच्या भागात गेल्या २० दिवसांपासून अत्यंत अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना जुलाब, उलट्या आणि पोटदुखी यांसारख्या आजारांची लागण झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले आहे.
या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत दूषित पाणीपुरवठा सुरू असल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
या समस्येची दखल water problem घेत पुणे पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी पुणे महानगरपालिकेकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.भोसले यांनी प्रशासनावर टीका करताना म्हटले की, शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून, दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाणीपुरवठा वाहिन्यांची तातडीने तपासणी करून समस्या दूर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पुणे पँथर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असेही भोसले यांनी स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी केली आहे. सध्या आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांना पाणी गाळून आणि उकळून वापरण्याचे आवाहन करण्यात आले असून, परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.