- ६७ शाळा अंधारात, ४० शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहच नाही
नागपूर,
Reality of Schools in Nagpur नागपूर जिल्ह्यातील शाळांमधील मूलभूत सुविधांची स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात असला, तरी अनेक शाळांमध्ये वीज, स्वच्छतागृहे, खेळाचे मैदान आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा अद्यापही अपुऱ्या असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
यू-डायसच्या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण ३ हजार ९५९ शाळा कार्यरत आहेत. पिण्याच्या पाण्याची सुविधा सर्व शाळांमध्ये उपलब्ध असल्याचे दिसते. मात्र, इतर मूलभूत सुविधांच्या बाबतीत परिस्थिती तितकीशी समाधानकारक नाही. जिल्ह्यातील ३ हजार ८९२ शाळांमध्ये वीज उपलब्ध असली, तरी ६७ शाळा अजूनही विजेच्या सुविधेपासून वंचित आहेत. तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा वाढता वापर लक्षात घेता ही बाब गंभीर मानली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेले खेळाचे मैदानही सर्व शाळांमध्ये उपलब्ध नाही. जिल्ह्यातील ३ हजार ८४७ शाळांमध्ये मैदानाची सुविधा असून ११२ शाळांना या सुविधेचा अभाव आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वच्छतागृहांच्या उपलब्धतेबाबतही काही प्रश्न कायम आहेत. मुलांसाठी ३ हजार ८५१ शाळांमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे, तर मुलींसाठी ३ हजार ९१९ शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे काही शाळांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांना मूलभूत स्वच्छता सुविधांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.
विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. जिल्ह्यातील केवळ १,७२० शाळांमध्येच रॅम्पची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच मोठ्या संख्येने शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना सुलभ प्रवेशाची व्यवस्था नाही. समावेशक शिक्षणाच्या उद्दिष्टाला यामुळे धक्का बसत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
Reality of Schools in Nagpur राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असलेल्या नागपूर जिल्ह्यात शाळांमधील या मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे शिक्षण व्यवस्थेच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपलब्ध होणारा निधी प्रत्यक्षात सुविधांमध्ये कितपत रूपांतरित होतो, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
- नागपूर जिल्ह्यातील शाळांची सुविधा स्थिती
शाळांमध्ये उपलब्ध सुविधा - शाळांची संख्या
पिण्याचे पाणी - ३९५९
वीज - ३८९२
खेळाचे मैदान - ३८४७
मुलांसाठी स्वच्छतागृह - ३८५१
मुलींसाठी स्वच्छतागृह - ३९१९
अपंगांसाठी रॅम्प - १७२०
- ठळक बाबी
६७ शाळा अजूनही विजेविना
४० शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृह नाही
११२ शाळांमध्ये खेळाचे मैदान नाही
निम्म्याहून अधिक शाळांमध्ये रॅम्पची सुविधा अनुपस्थित
विद्यार्थ्यांसाठीच्या निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह