‘अमरत्वा’च्या दिशेने रशियाची झेप?

पुतिन यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चर्चेत

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
मॉस्को,
Russia's leap towards immortality रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली मानवाचे आयुष्य वाढविणे आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावणे यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगली आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी अब्जावधी डॉलर्सची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले जात असून, दीर्घायुष्य आणि अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रशिया मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करत आहे.माहितीनुसार, २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या एका विशेष राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत मानवी शरीरातील पेशींचे वृद्धत्व कमी करणे, अवयव पुनर्निर्मिती तंत्रज्ञान विकसित करणे आणि जीवनमान अधिक काळ टिकवून ठेवण्यावर भर दिला जात आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश केवळआयुष्य वाढविणे नसून वृद्धत्वाशी संबंधित आजारांवर नियंत्रण मिळवणे आणि लाखो नागरिकांचे आरोग्य सुधारण्याचा आहे.
 
 
 
immortality
 
या संशोधनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे ‘ऑर्गन बायोप्रिंटिंग’ तंत्रज्ञान. या पद्धतीत 3D प्रिंटिंगच्या साहाय्याने जिवंत ऊती आणि भविष्यात प्रत्यारोपणासाठी उपयुक्त ठरू शकणारे जैविक अवयव तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रशियन वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत काही जैविक ऊती आणि थायरॉईडसारख्या संरचनांवर यशस्वी प्रयोग केल्याचा दावा केला आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी अवयवांच्या कमतरतेची समस्या कमी होऊ शकते, असे संशोधकांचे मत आहे.या प्रकल्पात वैद्यकीय आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक संशोधक सहभागी असून, दीर्घायुष्य संशोधनाला रशियन सरकारकडून पाठबळ दिले जात आहे. काही अहवालांनुसार, या उपक्रमाशी पुतिन यांची कन्या आणि अंतःस्रावी तज्ज्ञ डॉक्टरही संबंधित असल्याचे सांगितले जाते.
 
 
तथापि, या प्रकल्पाबाबत सर्वच तज्ज्ञ एकमत नाहीत. काही वैज्ञानिकांच्या मते, मानवी आयुष्य लक्षणीयरीत्या वाढविणे शक्य असले तरी "अमरत्व" मिळविण्याचा दावा सध्याच्या विज्ञानाच्या कक्षेबाहेर आहे. त्यामुळे या प्रकल्पातील काही दाव्यांकडे सावधपणे पाहण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे. दरम्यान, आरोग्य आणि फिटनेसबाबत जागरूक असलेले पुतिन स्वतःही निरोगी जीवनशैलीचे समर्थन करताना दिसतात. त्यामुळे दीर्घायुष्य आणि पुनरुत्पादक वैद्यकशास्त्राच्या क्षेत्रातील हे संशोधन केवळ रशियापुरते मर्यादित न राहता जागतिक चर्चेचा विषय बनले आहे.