नागपूर,
Seva Sadan in JEE Advanced सेवासदन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सीताबर्डी येथील विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची देशपातळीवर छाप उमटवली आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाविद्यालयाचा विद्यार्थी माधव नेतानी याने अखिल भारतीय स्तरावर २५ वा क्रमांक मिळवत उज्ज्वल यशाची नोंद केली. तसेच कोविद बुब याने अखिल भारतीय ८२ वा क्रमांक प्राप्त करून संस्थेचा नावलौकिक अधिक उंचावला. देशातील अत्यंत स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत, उपाध्यक्ष बापू भागवत, डॉ. समय बनसोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे पालक संचालक अमर कुलकर्णी, मुख्याध्यापक डॉ. अजय चव्हाण, पर्यवेक्षक संदीप झाडे तसेच शिक्षकवृंद आणि पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.
Seva Sadan in JEE Advanced यावेळी विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमासोबतच शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचे भक्कम सहकार्य हे यशामागील प्रमुख घटक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
जेईई अॅडव्हान्ससारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत मिळविलेले हे यश भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे असून, उत्कृष्टतेचा ध्यास घेतल्यास कोणतेही ध्येय अशक्य नसल्याचा संदेश या विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीतून दिला आहे.