कामाच्या गुणवत्तेवर शंका
तिवसा,
Solar Project शेतकर्यांना दिवसा अखंड वीजपुरवठा मिळावा आणि सिंचनाचा खर्च कमी व्हावा या उद्देशाने शासनाकडून राबविण्यात येणार्या महत्त्वाकांक्षी कुसुम सौरपंप योजनेतील कामांच्या गुणवत्तेचा बुरखा नुकत्याच झालेल्या अवकाळी वादळी पावसाने फाडला आहे. तिवसा येथील शेतकरी निळकंठ सुदामराव खाकसे यांच्या शेतातील सुरवाडी खुर्द मध्ये बसविण्यात आलेला ५ केव्ही क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प अवकाळी जोरदार वार्याच्या तडाख्यात पूर्णपणे कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, शासनाच्या लाखो रुपयांच्या अनुदानातून उभारण्यात आलेली ही यंत्रणा अवघ्या एका वादळी वार्याचा सामना करू शकली नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेले साहित्य, लोखंडी स्ट्रक्चर, पाया बांधकाम आणि तांत्रिक निकष याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सोलर पॅनल, लोखंडी फ्रेम आणि अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्याचे दिसून आले. यामुळे शेतकर्यांचे सिंचनाचे नियोजन कोलमडले असून आगामी पिकांसाठीही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
Solar Project कुसुम योजनेतील कामे मंजूर करताना आणि पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागाकडून गुणवत्ता तपासणी करण्यात येते. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर उभारलेला सोलर प्रकल्प एका वादळात जमीनदोस्त झाल्याने तपासणी प्रक्रिया कितपत प्रभावी आहे, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकरी निळकंठ खाकसे यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित कंत्राटदार आणि कामाच्या गुणवत्तेसाठी जबाबदार अधिकार्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.