काही भागात गार पडल्या
सखल भागात पाणी शिरले
अमरावती,
Stormy Rains in Amravati District अमरावती शहर व जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये सोमवारी जोरदार मान्सून पूर्व पाऊस झाला. काही ठिकाणी झाडे कोसळली, विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. सखल भागात पाणी शिरले. काही भागांमध्ये तुरळक स्वरूपात गार देखील पडली.
अमरावती शहरात साडेतीन वाजताच्या दरम्यान पावसाला जोरात सुरूवात झाली. तब्बल सव्वातास पाऊस सुरू होता. अधूनमधून काही भागात तुरळक गार पडली. या मुसळधार पावसामुळे शहरातल्या अनेक सखल भागामध्ये पाणी शिरले. विशेष म्हणजे अमरावती महानगरपालिकेच्या आवारात तळे साचले होते. काही मुख्य रस्त्यांवरही पाणी तुंबले होते. नाल्यांमध्ये पाणी तुंबल्याने ते रस्त्यावर आले होते. मनपाच्या स्वच्छता विभागाची पोलखोल पावसाने केली. या पावसाने गरमीने हैराण झालेल्या अमरावतीकरांना गारव्याचा दिलासा दिला. पाऊस थांबल्यानंतरही ढगाळ वातावरण होते आणि थंड हवा सुरू होती. जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलका तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आला. काही ठिकाणी नुकसानीची नोंद झाली आहे.
वरूडात चक्रीवादळासह गारपीट
सोमवारी वरूड शहरात दुपारी दोन वाजताचे दरम्यान अचानक चक्रीवादळ आले. यामध्ये राष्ट्रीय महामार्गासह अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. तहसील कार्यालयासमोर चौकातील एक महाकाय झाड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र उर्फ बबलू पावडे यांच्या कारवर आदळले. मात्र, समयसूचकता पाळून सभापती पावडे, त्यांचा मुलगा आणि दोन मित्रांसह बाहेर पडल्याने थोडक्यात बचावले. या झाडामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली होती. वादळीवार्याने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले, विद्युतवाहिन्या तुटून पडल्या, झाडाखाली असलेल्या दुचाकी सुद्धा क्षतीग्रस्त झाल्या. शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला तर वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. यावेळी नगर परिषद अग्निशमन दल आणि वरूड पोलिसांनी रस्ता मोकळा करून वाहतूक सुरू केली.
अचलपुरात मुसळधार पाऊस
गेल्या तीन महिन्यांपासून प्रचंड उष्णतेने होरपळणार्या अचलपूर-परतवाडा शहराला अखेर मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा दिला. रविवारी व सोमवारी शहरात थंड वार्यासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्याने त्रस्त नागरिकांसह जनावरांनाही या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. पावसासोबतच सोसाट्याचा वारा वाहिल्याने वातावरणातील उष्णता कमी झाली. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले असले तरी या पावसाने मान्सूनच्या आगमनाची चाहूल दिल्याचे चित्र दिसून आले. शेतकर्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असला तरी घाईघाईने पेरणी करू नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. महाराष्ट्रात साधारणपणे ७ जूननंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
धारणीत वादळ, १५० गावे अंधारात
Stormy Rains in Amravati District धारणी शहरासह जवळच्या अनेक गाव शिवारात सोमवारच्या सायंकाळी जोरदार वादळासह तुफानी पाऊस पडला. कुसुमकोट ते भोकरबर्डी मार्गावर जवळपास २० झाडे पडलेली होती. अर्धा तास बर्हाणपूर आणि खंडवा वाहतूक बंद होती. गंभीरता लक्षात घेता माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल यांनी आपल्या जेसीबीने रस्त्यावरील वरील झाडे हटवून रस्ता मोकळा केला. विजेचे तार अनेक ठिकाणी तुटलेले असल्याने धारणी उप केंद्रातील १५० गावे अंधारात बुडालेली आहेत. (छायाचित्र : एएम १ जेएन - पाणी : वरूडच्या मुख्य मार्गावर कारवर आदळलेले वृक्ष)