वेध
अनिल उमाकांत फेकरीकर
Summer fruit mango प्रत्येक ऋतूत एक गोडवा असतो. पण उन्हाळ्यातील आमरसाची मजाच काही वेगळी असते. म्हणूनच उन्हाळा म्हणजे आंबा खाण्याचा आनंद देणारा ऋतू असतो. याच कारणाने अनेक जण उन्हाळ्याची आतुरतेने प्रतीक्षा करतात. वर्तमानात महाराष्ट्रातील प्रत्येक जण उन्हाळ्याचा विशेषत: सूर्य प्रकोपाचा सामना करीत आमरसाचाही गोडवा चाखत आहे. पण हा आनंद मिळत असला तरी वाढत असलेला सूर्याचा प्रकोप पाहता पुढे काय होणार, अशीच चिंता सर्वांचा रक्तदाब वाढवीत आहे. याच गंभीर संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा झाल्यास राजाश्रयाचा विचार न करता प्रत्येकाने लोकाश्रय देत आमराई उभारण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने भरपूर आंबे खा, पण कोया मात्र जपून ठेवत त्याचीच पावसाळ्यात लागवड करून आमराई उभारा. अशाच स्वरूपाची नामी संधी आपल्याला मिळणार आहे. अकोला शहरात मे 2023 मध्ये तेथील मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी भरपूर आंबे खा पण कोया जमा करा, असे नागरिकांना आवाहन केले होते. त्यानुसार सुमारे 5 हजारांपेक्षा जास्त कोयांना गोळा करीत अकोला शहरातील खुल्या जागेवर त्यांची लागवड करण्यात आली होती. आता तसाच प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची गरज आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3 लाख 7 हजार 713 चौरस किलोमीटर आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रफळात आपण राहत असलो तरी वृक्षांची घटती संख्या पाहता महाराष्ट्रातील वातावरण सातत्याने तापत आहे. या स्थितीत समजा 7 कोटी लोकांनीही मनावर घेत प्रत्येकी 5 कोया या उन्हाळ्यात जमा करून त्यांची पावसाळ्यात लागवड केल्यास सुमारे 35 कोटी आंब्याची झाडे आपण लावू शकतो. कुठलाही गाजावाजा न करता प्रत्येकाने हे कार्य स्वत:साठी करायला हवे. मिळेल त्या जागेवर आंब्याची झाडे लावल्याने फार मोठे पुण्य आपल्या पदरात पडेल.
Summer fruit mango महाराष्ट्र ही संतांची भूमी असा आपण अभिमानाने उल्लेख करतो. समजा 35 कोटी आंब्याच्या कोया लावण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्यास संत भूमीसह महाराष्ट्र आमराईचे राज्य असाही अभिमानाने उल्लेख करावा लागेल. जंगलातील प्राणी अन्न मिळत नसल्याने गावांकडे धाव घेतात. कारण काय तर वन विभागाने फळांऐवजी भलत्याच झाडांची लागवड केली आहे. त्याच चुकीचा फटका वन्यप्राण्यांसह माणसालाही बसला आहे. पण जेव्हा संपूर्ण राज्यात खुल्या जागेवर आंब्याची झाडे लागतील, तेव्हा त्यापासून सर्वांनाच लाभ होईल. गाईंना खायला आंब्याची पाने मिळतील. शिवाय माणसांना आंबा मिळेल. भूगर्भातील जलस्तर उंचावून ऑक्सिजनची मात्राही वाढेल. वाटसरूंना सावली मिळेल. म्हणजेच काय तर आंब्याची लागवड लाभदायकच ठरेल. विशेष म्हणजे घरोघरी आंबे एकसारखे आणले जात नाहीत. प्रत्येक जण आपापल्या परीने विविध जातींचे आंबे विकत आणून आमरसाचा आनंद घेत असतो. आता विविध जातींच्या आंब्यांची लागवड झाल्याने कोकणातील हापूसची मजा नागपुरातील व्यक्तीला नि:शुल्क घेता येईल. यातूनच आपल्या आंब्याच्या पारंपरिक जातींनाही लोकाश्रय मिळून त्यांचेही जतन आपोआप होईल. नागपूर जिल्ह्यातील कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात मुख्य अभियंता विलास मोटघरे यांनी पुढाकार घेत सुमारे 25 हेक्टर परिसरात 7758 झाडे लावून उभारलेली आमराई ही महानिर्मितीसाठी अभिमानास्पद प्रयोग ठरली आहे. रामटेक तालुक्यातील खिंडसी आणि मनसर रामधाम येथे पर्यटकमहर्षी चंद्रपाल चौकसे यांनी सुमारे 10 हजार वृक्षांचे रोपण करीत स्वबळावर त्याचे यशस्वी संवर्धनही करून दाखविले आहे. मग आपणही आंबे खायचे आणि कोया जपून त्यांच्या लागवडीचा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात केल्यास चमत्कार नक्कीच घडू शकतो. शेवटी, ‘तुम्हीच वापरा तुमची शक्ती, तुम्हीच घ्या लाभ पुरा, हाच जलस्वराज्यचा मंत्र खरा’ या फॉर्म्युलानुसार आमराईच्या प्रयोगाला लोकाश्रय मिळाल्यास त्याचे दूरगामी लाभ सर्वांनाच मिळतील. फळांचा राजा आंबा उत्कृष्ट चवीसोबत आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर भरपूर असते. आंबा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. पचनक्रिया सुधारते आणि त्वचा निरोगी राहते. डोळ्यांना व्हिटॅमिन ए लाभदायक असल्याने दृष्टी सुधारते. आंबा कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. यामुळे हृदय निरोगी राहते. एकंदरीत पाहता प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील कडू आठवणी विसरून आंबा जसा चोखून खाता, तसाच प्रत्येक क्षणाचा गोडवा चाखावा, तेच सर्वांसाठी फलदायी ठरेल.
9881717859