अनिल कांबळे
नागपूर,
cyber crimes सायबर गुन्हेगारांनी देशभरात थैमान घातले असून सामान्य नागरिकांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत सर्वच वर्गातील नागरिकांना सायबर गुन्हेगारांनी काेट्यवधीने लुबाडले आहे. देशात सर्वाधिक सायबर गुन्हे तेलंगणा राज्यात दाखल असून महाराष्ट्र राज्य चवथ्या स्थानावर आहे. तेलंगणात 27 हजार 230 गुन्हे दाखल आहेत तर महाराष्ट्रात 9 हजार 922 सायबर गुन्हे दाखल आहेत. ही धक्कादायक आकडेवारी एनसीआरबीच्या अहवालातून समाेर आली आहे.
देशात सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत असून सर्वाधिक आर्थिक फसवणुकीच्या घटना समाेर येत आहेत. देशातील जयपूर, दिल्ली, नाेएडा, छत्तीसगड, मुंबई आणि जामतारा ही शहरे सायबर गुन्हेगारांच्या टाेळींसाठी ओळखली जातात. तसेच विदेशातीलही सायबर गुन्हेगार भारतीयांची काेट्यवधीने फसवणूक करीत आहेत. सायबर गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्यात यश येत नसल्यामुळे दरदिवशी नागरिकांची लाखाेंनी फसवणूक हाेत आहे. गेल्या वर्षभरात देशात एक लाख 1 हजार 928 सायबर गुन्हे दाखल आहेत. देशात तेलंगणात सर्वाधिक 27 हजार 230 सायबर गुन्हे नाेंद आहे. तिसèया स्थानावर उत्तरप्रदेश या राज्याचा क्रमांक लागत असून तेथे 11 हजार 73 सायबर गुन्ह्यांची नाेंद करण्यात आली. चवथ्या स्थानावर महाराष्ट्र असून 9 हजार 922 गुन्हे तर पाचव्या क्रमांकावरील बिहारमध्ये 6 हजार 380 सायबर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मुंबई-पुणे ‘टाॅप फाईव्ह’मध्ये
सायबर गुन्हेगारीत जरी महाराष्ट्राचा चवथा क्रमांक असला तरी मुंबई आणि पुणे शहराचा देशातील ‘टाॅप -5’मध्ये समावेश आहे. बंगळुरू शहरात सर्वाधिक 17 हजार 561 सायबर गुन्हे दाखल आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या मुंबईत 4 हजार 939 सायबर गुन्हे दाखल आहेत. हैदराबादमध्ये 4 हजार 9 गुन्हे तर चेन्नईमध्ये 1882सायबर गुन्हे दाखल आहेत. देशात पाचव्या स्थानावर असलेल्या पुण्यात 1504 गुन्हे दाखल आहेत.
पाेलिसांची निष्क्रीयता आणि अपयश
सायबर गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्यात पाेलिसांना अपयश आले आहे. नागरिकांचे काेट्यवधी रुपये सायबर गुन्हेगार लुटत आहेत. सायबर पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदविण्यास गेलेल्या तक्रारदारांशी पाेलिस साैजन्याने वागत नाहीत. खात्यातून पैसे गेल्यानंतर पाेलिस नागरिकांचीच उलटचाैकशी करतात. तसेच अनेकांच्या तक्रारीच नाेंदवून घेत नाहीत. लहान रक्कम असल्यास पाेलिस नागरिकांच्या मनात भीती घालून त्यांना पाेलिस ठाण्यातून हुसकावून लावतात, असा प्रकार अनेकांसाेबत घडल्याची माहिती समाेर आली आहे.
‘डिजीटल अरेस्ट’चे सर्वाधिक बळी
देशभरात सायबर गुन्हेगारांनी शासकीय सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक टार्गेट केले आहे. डिजीटल साक्षर नसलेल्या वृद्धांना सीबीआय, ईडी, एटीएस, पाेलिस आणि संरक्षण खात्यातून बाेलत असल्याचे सांगून व्हिडिओ काॅल करुन ‘डिजीटल अरेस्ट’ केल्या जाते.cyber crimes शासकीय कार्यालयाचा देखावा निर्माण करुन लाखाे रुपये सायबर गुन्हेगार उकळतात. यासाेबतच ‘एपीके फाईल्स’ पाठवूनही माेबाईलचा ताबा मिळवून सायबर फसवणूक केल्याच्या सर्वाधिक घटना समाेर आल्या आहेत.