अहमदाबाद,
Womens Champions Trophy आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्ष जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली अहमदाबादमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महिला क्रिकेटसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
वुमेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ फेब्रुवारीत
पुरुष क्रिकेटप्रमाणेच आता महिला क्रिकेटमध्येही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होतील. मात्र, आधी निश्चित केलेले जून-जुलाई २०२७ चे वेळापत्रक बदलण्यात आले असून, आता ही स्पर्धा १४ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे, पुरुषांची चॅम्पियन्स ट्रॉफी ५०-षटकांच्या (वनडे) प्रारूपात होते, तर महिलांची ही स्पर्धा टी२० प्रारूपात खेळवली जाणार आहे.
भारत विरुद्ध पाक सामन्यांबाबत ICC चा निर्णय
२०२८ च्या महिला टी२० विश्वचषकाचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे. परंतु भारत-पाकिस्तान तणावामुळे भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही. ICC ने स्पष्ट केले आहे की भारताचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी आयोजित केले जातील. यापूर्वी पुरुष संघानेही चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता.
वुमेन्स इमर्जिंग नेशन्स ट्रॉफीची सुरुवात
महिला क्रिकेटच्या विकासासाठी ICC एक नवीन स्पर्धा सुरू करणार आहे — वुमेन्स इमर्जिंग नेशन्स ट्रॉफी ही स्पर्धाही टी२० प्रारूपात होईल. यात एकूण १० संघ भाग घेतील — ५ ICC पूर्ण सदस्य देश आणि ५ सहयोगी सदस्य देश. मात्र या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.