अहमदाबाद,
Vaibhav's sixer on awards रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने आयपीएल २०२६च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयासह आरसीबीच्या खात्यात तब्बल २० कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जमा झाली, तर उपविजेत्या गुजरात टायटन्सला १२.५ कोटी रुपये मिळाले. मात्र, स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची.संपूर्ण हंगामभर दमदार फलंदाजी करत वैभव सूर्यवंशीने ऑरेंज कॅप जिंकलीच, शिवाय ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’, ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन’, ‘सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन’ आणि ‘सर्वाधिक षटकार’ असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार आपल्या नावावर केले. या कामगिरीबद्दल त्याला लाखो रुपयांची बक्षीस रक्कम तसेच एक आलिशान सिएरा कारही प्रदान करण्यात आली. त्यामुळे आयपीएल २०२६चा सर्वात मोठा वैयक्तिक स्टार म्हणून वैभव सूर्यवंशी समोर आला.

गोलंदाजांमध्ये कागिसो रबाडाने सर्वाधिक बळी घेत पर्पल कॅप जिंकली, तर मोहम्मद सिराजला सर्वाधिक डॉट चेंडू टाकल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. साई सुदर्शनला सर्वाधिक चौकारांचा पुरस्कार मिळाला, तर मनीष पांडेने घेतलेल्या अप्रतिम झेलासाठी ‘कॅच ऑफ द सीझन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळीसाठी विराट कोहलीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला. गुजरातविरुद्धच्या दडपणाच्या सामन्यात कोहलीने नाबाद ७५ धावांची शानदार खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. त्याच्या खेळीत तीन षटकार आणि नऊ चौकारांचा समावेश होता. सुरुवातीला व्यंकटेश अय्यरने ३२ धावांचे योगदान देत विजयाचा पाया रचला.
यापूर्वी गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावांपर्यंत मजल मारली होती. शुभमन गिल आणि साई सुदर्शन लवकर बाद झाल्याने गुजरातची सुरुवात डळमळीत झाली. मधल्या फळीतही मोठी भागीदारी उभी राहिली नाही. मात्र, वॉशिंग्टन सुंदरच्या अर्धशतकामुळे संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने सुरुवातीपासून नियंत्रण राखले. काही झटपट विकेट्स पडूनही विराट कोहलीने संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ साधत संघाला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचवले. या विजयासह आरसीबीने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल ट्रॉफी उंचावत आपल्या वर्चस्वाची पुन्हा एकदा प्रचिती दिली.