जिपच्या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या राज्यव्यापी आंदोलनाचा ‘श्रीगणेशा’

    दिनांक :01-Jun-2026
Total Views |
- रखडलेल्या मानधनासाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे

गोंदिया, 
Zp contract employees पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचार्‍यांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. थकीत मानधन अदा करण्याच्या मागणीचे निवेदन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कर्मचार्‍यांनी दिले होते. यात 30 मे पर्यंत मानधन न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही दिला होता. या अनुषंगाने सोमवारी 1 जून रोजी महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाचे श्रीगणेशा करण्यात आले असून येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर कर्मचार्‍यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केले आहे.
 
 
zp
 
Zp contract employees  राज्यातील पंचायत समिती अंतर्गत पाणी व स्वच्छता विभागात कार्यरत गट समन्वयक व समूह समन्वयक अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियान तसेच जल जीवन मिशन यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हे कर्मचारी सातत्याने कार्य करीत आहेत. मात्र, मागील डिसेंबर 2025 पासून आतापर्यंत तब्बल सहा महिन्यांचे मानधन अद्याप मिळाले नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. यावर त्वरीत तोडगा काढून 30 मे पर्यंत मानधन अदा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनातून करण्यात आली होती. मात्र, दिलेली अवधी लोटूनही मानधन मिळाले नसल्याने अखेर कर्मचार्‍यांनी आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 1 जून ते 5 जून कालावधीत जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून 8 जून रोजी संबंधति विभागाच्या मंत्र्यांच्या घरासमोर धरणे आणि त्यानंतर तिसर्‍या टप्प्यात मागण्या मान्य होईपर्यंत राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, आंदोलनात महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गांधी पटले, सचिव कैलाश कोरे, सुभाष बोहरे, छाया बोरकर, तृप्ती साकुरे, शोभा फटींग यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गट व समुह समन्वयक, जिल्हा कक्षातील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहे.