‘ग्लॅमरस’ होतेय धोंड्याची प्रथा

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
वेध 
विजय निचकवडे
adhik mahina tradition रितीभाती त्याच आहेत, पण डिजिटल क्रांती आणि चंगळवादामुळे प्रथा-परंपरांनाही आता ‘ग्लॅमर’ प्राप्त होऊ लागले. ज्या ‘धोंड्या’ला कुणी फारसं ओळखत नव्हतं, तो घरोघरी पोहोचलेला अधिकमास आणि त्याचे झालेले ‘इव्हेंट’ आज सोशल मीडियावर धूम करीत आहेत. बडेजाव, श्रीमंती दाखविताना या महिन्यातील पावित्र्य अडगळीत पडले आणि भक्तीचा सोहळा ‘स्टेटस’चा विषय झाला. जुन्याचा स्वीकार केला ही एक सकारात्मक बाब असली, तरी हे करताना ‘धोंड्या’ची लागलेली ‘वाट’ पाश्चिमात्यकरणाचा किती पगडा आमच्या डोक्यावर आहे, हे सांगून जाते.
 
 
 धोंड्याची प्रथा
 
 
गावागावातील जावई आणि लेकी सध्या सासरी निघाल्या आहेत. काय तर म्हणे, अधिकाचं वाण घ्यायला आणि धोंड्याच्या जेवणासाठी सासरचं बोलावणं आहे. तीन वर्षांनंतर एकदा येणाèया अधिकमासात जावयाला वाण देण्याची प्रथा वर्षानुवर्षांपासून सुरू आहे. अधिक महिन्याचे पावित्र्य असल्याने याचे धार्मिक महत्त्वही आहे. पण आज अधिकाचे वाण म्हणजे प्रत्येकासाठी ‘इव्हेंट’ झाला असेच भासू लागले आहे. तो करतो, म्हणून आपण करावं. नुसतं करायचं नाही, तर त्याने जावयाचं कौतूक किती केलं, त्यापेक्षा वेगळं काय करता येईल, अशी मानसिकता ठेवून आज अधिकमासात सोहळे पार पडत आहेत.
खरं तर अधिकमास म्हणजे भक्तीचा सोहळा! वैज्ञानिक दृष्टिकोनातून सौरवर्ष आणि चंद्रवर्ष यांची सांगड म्हणून या महिन्याकडे पाहिले जाते तर या महिन्याला धार्मिक परंपरेचीही जोड आहे. भगवान विष्णूच्या उपासनेचा काळ म्हणून विशेष महत्त्व आहे. दानधर्म आणि आत्मशुद्धीचा काळ म्हणून याकडे पाहिले जाते. त्यामुळे धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि दान याचे विशेष महत्त्व आहे. आज अधिकमासानिमित्त ठिकठिकाणी भागवत सप्ताह होत असताना घराघरात जावयांचे कौतूक सोहळे पाहायला मिळत आहे. लेक-जावई म्हणजे लक्ष्मी-नारायणाचा जोडा, म्हणून जावयांना वाण देत पुण्य मिळविण्याची धडपड सासरच्या मंडळीची असते. मात्र, आज पुण्य मिळविण्याच्या नादात धार्मिकतेला अडगळीत टाकल्यात स्थिती आहे.
 
जावयाला दान देताना 33 अनारसे देण्याची प्रथा होती; आज या दानालाही ‘ग्लॅमर’ निर्माण झाले आहे. अनारस्यांची जागा महागड्या मिठाईंनी घेतली आहे. तांब्याचे दिवे असलेले वाण सूपात दिले जायचे. आज तांब्याची जागा सोन्याने घेतली आहे. कुणी जावयाला सोन्याची अंगठी करतो, तर कुणी चांदीची चप्पलसुद्धा! एवढेच काय तर ‘इंटरनॅशनल टूर्स’चे पॅकेजही वाणात मिळू लागले आहे. आधीचे जावई जरा सामान्यच होते, पण आजचा जावई मोठ्या पॅकेजचा असल्याने कदाचित वाणाचे स्वरूपही त्याला साजेसे झाले असावे.
 
फाईव्ह स्टार हॉटेलात होणारे जावई जेवण, त्याचे फोटो काढून ‘अधिकमास स्पेशल जेवण’ असा हॅशटॅग वापरून समाज माध्यमांवर टाकलेले फोटो परंपरागत प्रथा-परंपरांचे ‘सूप’ वाजल्याचेच सांगते. आम्ही दानधर्म करतो, पण ते दाखवून. भागवतासारखे सोहळे करू, तेही बडेजाव दाखवूनच! मग खरंच अधिकमासाचे महत्त्व आपण जपतो आहोत का? कधीकाळी काही लोकांपर्यंत शिल्लक असलेल्या अधिकाच्या वाण्याचे लोण घरोघरी पोहोचले.adhik mahina tradition हे जरी सकारात्मक वाटत असेल, तरी त्याचे बदललेले स्वरूप विदारक आहे. दाखविण्यासाठी आणि इव्हेंट म्हणून जर धार्मिक सोहळे होत असतील तर त्यातून फक्त वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोच निघू शकतील; त्या मागचा मूळ हेतू प्रवाहित होऊ शकणार नाही.
 
अहंकार सोडून साधेपणाने वागणे शिकविणारा हा अधिकमासाचा काळ आहे. त्यात जर डिजिटल क्रांती आणि चंगळवादाच्या माध्यमातून अहंकारी वृत्तीचे प्रदर्शन केले जाणार असेल तर भक्तीच्या सोहळ्याचा बाजार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने अधिकमासाच्या वाणाचे आणि जेवणाची व्याप्ती यावर्षीच्या अधिकमासात वाढली, त्यावरून जावई मंडळी नक्कीच समाधानी असतील, पण या समाधानात संस्कृती आणि धार्मिकतेचा ओलावा नसेल! जुन्या प्रथा-परंपरा पाळल्या जाणे नक्कीच पाश्चिमात्यीकरणाच्या काळात गरजेचे आहे. पण त्याचा धार्मिक भाव अबाधित ठेवूनच ते व्हावे, नाहीतर आता चंगळवाद आणि अहंकाराचा धोंडा कधी आपल्या संस्कृतीचे ‘वाटोळे’ करून नवीन पिढीला फक्त इव्हेंटपुरते मर्यादित करून बसेल, याचा नेम नाही.
 
9763713417
....