मंगरूळनाथ,
attack on tax official अहेरी नगरपंचायत येथे कार्यरत कर अधिकारी वैभव पाढंरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मंगरूळनाथ नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचार्यांनी काळी फित लावून तीव्र निषेध व्यक्त केला. शासकीय कर्तव्य बजावत असताना अधिकार्यावर झालेला हा हल्ला अत्यंत गंभीर व निंदनीय असून संबंधित आरोपींवर कठोर फौजदारी कारवाई करून तात्काळ अटक करावी अशी मागणी मंगरूळनाथ नगरपरिषद कर्मचार्यांनी १० जून रोजी निवेदनातून केली.
निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना, जिल्हा गडचिरोली यांच्या निवेदनानुसार अहेरी नगरपंचायतीचे कर अधिकारी वैभव पाढंरे यांच्यावर अजय कंकडलवार व त्यांच्या साथीदारांनी हल्ला केला. शासकीय कामकाज पार पाडणार्या अधिकार्यावर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर हल्ला असल्याचे नमूद आहे. या घटनेमुळे राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत मधील अधिकारी-कर्मचार्यात भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणार्या व अधिकार्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार्या प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद आहे.
संघटनेने संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी मंगरूळनाथ नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी केली आहे.attack on tax official तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी अधिकारी व कर्मचार्यांच्या सुरक्षे संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी मंगरूळनाथ नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचार्यांनी केली आहे.