१२ हजार फूट उंचीवरून बबिता अचानक गायब!

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
डेहराडून
Babita suddenly disappears उत्तराखंडमधील प्रसिद्ध दयारा बुग्याल ट्रेकदरम्यान एका २३ वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील उंच पर्वतीय भागात ट्रेकिंगसाठी गेलेली बबिता पांडे ही तरुणी गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता असून तिचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे. मात्र एवढ्या मोठ्या शोधकार्यानंतरही तिचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.रामनगर परिसरातील रहिवासी असलेली बबिता दोन मैत्रिणींसह दयारा बुग्याल ट्रेकसाठी गेली होती. ट्रेकदरम्यान त्या गोई बेस कॅम्पवर मुक्कामाला होत्या. त्याच रात्री बबिता तंबूतून बाहेर पडली आणि त्यानंतर ती परतच आली नाही, अशी माहिती तिच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. या घटनेनंतर परिसरात तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली.
 
 

Babita disappears 
 
बबिताचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी, पोलीस दल तसेच स्थानिक बचाव पथके दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. दुर्गम डोंगराळ भाग असल्याने ड्रोन, हेलिकॉप्टर आणि श्वान पथकांचीही मदत घेण्यात येत आहे. सुमारे १०० हून अधिक जवान या मोहिमेत सहभागी असून प्रत्येक शक्य दिशेने शोध सुरू आहे.तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित ट्रेकिंग एजन्सीने नियमबाह्य पद्धतीने ट्रेकचे आयोजन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अधिकृत परवानगी आणि नोंदणी प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याने प्रशासनाने संबंधित एजन्सीवर कारवाई करत तिची मान्यता निलंबित केली आहे. याप्रकरणी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांसह काही संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
 
 
दरम्यान, बबिताच्या सहकाऱ्यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून घटनेच्या रात्री नेमके काय घडले याचा तपास केला जात आहे. ट्रेकिंगदरम्यान सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचाही शोध घेतला जात आहे.बबिता ही आपल्या कुटुंबातील मोठी मुलगी असून तिला ट्रेकिंग आणि भटकंतीची विशेष आवड होती. मुलीच्या बेपत्ता होण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिवसेंदिवस वाढणारी अनिश्चितता आणि मुलीचा कोणताही मागमूस न लागल्याने कुटुंबीयांची चिंता अधिक वाढली आहे. तिची आई अश्रूंना वाट मोकळी करून देत मुलीच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना करत आहे. १२ दिवस उलटूनही बबिताचा शोध लागलेला नसल्याने हे रहस्य अधिकच गडद होत चालले असून संपूर्ण उत्तराखंडमध्ये या घटनेची चर्चा सुरू आहे.