नवी दिल्ली,
ben-stokes : इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन यांच्यातील नाईटक्लबमधील वादाने क्रीडाविश्वात खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणात ज्या रग्बी खेळाडूचे नाव आता समोर आले आहे, तो एक सामान्य खेळाडू नसून, ६ फूट ५ इंच उंच आणि अंदाजे १२५ किलो वजनाचा टोटोआ औवा आहे. त्याच्या ओळखीमुळे पुढील चर्चा सुरू झाली आहे.
रग्बी खेळाडूशी वाद
टेलिग्राफच्या वृत्तानुसार, ही घटना ८ जून रोजी पहाटे लंडनच्या चेल्सी येथील रेक्स रूम्स नाईटक्लबमध्ये घडली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी विजयानंतर बेन स्टोक्स आणि गस ऍटकिन्सन हे क्लबच्या व्हीआयपी विभागात होते. तिथे टोटोआ औवासह सारासेन्स रग्बी क्लबच्या काही खेळाडूंशी त्यांचा वाद झाला. वृत्तानुसार, औवाने गस ऍटकिन्सनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु चुकून त्याचा ठोसा इंग्लंड संघाच्या एका सुरक्षा रक्षकाला लागला. या वादात तो सुरक्षा रक्षक जखमी झाला आणि त्याला टाके घालावे लागले. या घटनेनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) चौकशी सुरू केली आहे.
टोटोआ औवा कोण आहे?
२१ वर्षीय टोटोआ औवा हा सारासेन्सच्या सर्वात प्रतिभावान तरुण खेळाडूंपैकी एक मानला जातो. सामोअन वंशाचा असलेला औवा, आपल्या ताकद आणि धिप्पाड शरीरयष्टीमुळे रग्बी क्षेत्रात झपाट्याने ओळख मिळवत होता. गेल्या हंगामात, तो इंग्लंडच्या दुसऱ्या डिव्हिजनमधील ॲम्प्थिल संघाकडून कर्जावर (लोनवर) खेळला, जिथे त्याने १७ सामने खेळले. त्याने सामोआ अंडर-२० आणि सामोआ 'अ' संघांचे कर्णधारपदही भूषवले होते. तथापि, या वादामुळे त्याच्या भविष्याबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. वृत्तानुसार, सारासेन्सदेखील या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
बेन आणि ॲटकिन्सन यांचे भविष्य अनिश्चित
ईसीबीने (ECB) एक निवेदन जारी करून सांगितले की, संघाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. बोर्डाने पुष्टी केली आहे की, ८ जूनच्या सकाळी ज्या नाईटक्लबमध्ये ही घटना घडली, तिथे स्टोक्स आणि ॲटकिन्सन उपस्थित होते. सध्या, हे दोन्ही खेळाडू १७ जूनपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. बेन स्टोक्सचे कर्णधारपदही धोक्यात आले आहे.