प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
बीड
boat overturn Beed बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तम पुरी परिसरात आज गोदावरी नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची घटना घडली. मात्र नदीकाठावरील नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून अनेक भाविकांचे प्राण वाचले आहेत. अधिक मासानिमित्त भाविकांची मोठी गर्दी असताना क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना बोटीत बसवण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
 

boat overturn Beed  
बोटीत सुमारे ५० हून अधिक प्रवासी असल्याचे सांगण्यात येते. बोट चालकाने प्रवाशांना उतरण्याची संधी न देता जबरदस्तीने बोटीत बसवले आणि त्यानंतर बोट नदीच्या काठाजवळच उलटली. काही प्रवासी थेट पाण्यात बुडाले असता परिसरातील नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून अनेकांना बाहेर काढले. या घटनेत चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर प्रवाशांनी बोट चालकावर गंभीर आरोप केले आहेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेहमीच घेतले जात असल्याचे सांगत काही महिलांनी घडलेला प्रसंग अंगावर काटा आणणारा असल्याचे नमूद केले. “बुडालो, देवाच्या नावाने वाचलो,” अशा भावना एका महिला प्रवाशाने व्यक्त केल्या. बोट व्यवस्थापन व प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही स्थानिक ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.दरम्यान, या परिसरात काही दिवसांपूर्वीच एका तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सलग घडणाऱ्या घटनांमुळे नदीकिनारी सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातही नदी दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कामठी तालुक्यातील महादेव घाट परिसरात पिकनिकसाठी गेलेल्या काही युवकांनी कन्हान नदीत पोहण्यासाठी उतरले असता तिघे जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. मृतांमध्ये दोन तरुण आणि एका बालकाचा समावेश आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने शोधमोहीम राबवत तिघांचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.या सलग घटनांमुळे नदीकिनारी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.