नागपूर,
Bomb threat at Nagpur RSS headquarters मुंबई, पुणे आणि नागपूरसह देशातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीत मुंबई आणि पुणे महापालिकेची महापौर कार्यालये तसेच नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय अहमदाबाद आणि गांधीनगरमधील सरकारी कार्यालयांनाही स्फोटांची धमकी देण्यात आली असून १० जून ते २० सप्टेंबरदरम्यान विविध वेळेत हल्ले करण्याचा उल्लेख ई-मेलमध्ये आहे.
धमकीमध्ये १९८४ मधील घटनांचा संदर्भ
मिळालेल्या माहितीनुसार, या ई-मेलमध्ये विशिष्ट ठिकाणे आणि वेळाही नमूद करण्यात आल्या असून पुणे महापौर कार्यालयात दुपारी १:११ वाजता, विधान भवन आणि नागपूरमधील RSS मुख्यालयात दुपारी ३:११ वाजता स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुणे आणि नागपूरमधील विविध आरएसएसच्या शाखांना दीर्घ कालावधीत लक्ष्य करण्याचा उल्लेखही या संदेशात आहे. या धमकीमध्ये १९८४ मधील घटनांचा संदर्भ देत काही राजकीय आरोपही करण्यात आले आहेत.
कार्यालये रिकामी करण्यात आली
धमकीचा ई-मेल मिळताच पुणे, मुंबई आणि नागपूर पोलिस, बॉम्बशोधक पथक, बीडीडीएस आणि सायबर विभाग तातडीने सक्रिय झाले आहेत. खबरदारी म्हणून महापालिका आणि संवेदनशील कार्यालये रिकामी करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना बाहेर हलवण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक इमारतीची सखोल तपासणी सुरू आहे.तपास यंत्रणांच्या प्राथमिक तपासात अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. त्यामुळे हा ई-मेल केवळ खोडसाळपणा आहे की मोठ्या कटाचा भाग, याचा तपास सायबर गुन्हे शाखेकडून सुरू आहे. ई-मेलचा IP पत्ता आणि स्रोत शोधण्यासाठी तांत्रिक तपासणी वेगाने केली जात आहे. दरम्यान, अहमदाबाद आणि गांधीनगरमधील कार्यालयांनाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या असून काही ठिकाणी इमारती रिकाम्या करून तपासणी करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी सध्या सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.