पुणे,
Bomb threat to Pune Municipal Corporation पुणे शहरातील प्रशासकीय वर्तुळात बुधवारी एकच खळबळ उडाली, जेव्हा पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीसह महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी ई-मेलद्वारे प्राप्त झाली. धमकीचा संदेश मिळताच प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू करत संपूर्ण महापालिका इमारत रिकामी केली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य इमारतीतील सर्व कामकाज तात्पुरते थांबवले आहे. बॉम्बशोधक आणि नाशक पथक, श्वान पथक तसेच पोलिसांच्या विशेष टीमकडून इमारतीतील प्रत्येक विभागाची बारकाईने तपासणी सुरू करण्यात आली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत महापालिका परिसरात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

धमकीचा संदेश महापालिकेच्या अधिकृत ई-मेलवर प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा ताबा घेतला. सुरक्षा यंत्रणांनी संवेदनशील विभाग, कार्यालये आणि सार्वजनिक वर्दळीच्या भागांची तपासणी सुरू केली आहे. सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसली तरी कोणताही धोका पत्करू नये म्हणून शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.दरम्यान, हा ई-मेल नेमका कुठून पाठविण्यात आला आणि त्यामागे कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर गुन्हे शाखेची मदत घेतली जात आहे. ही केवळ खोडसाळपणा म्हणून केलेली धमकी आहे की त्यामागे गंभीर कट आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून अधिकृत माहितीचीच दखल घ्यावी, असे स्पष्ट केले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे.