घर यादी गणनेत गडचिरोली राज्यात आघाडीवर

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
गडचिरोली,
Gadchiroli census progress, भारताच्या जनगणना 2027 अंतर्गत सध्या राज्यभर घर-यादी गणना मोहीम राबविण्यात येत आहे. 10 जून रोजीच्या आढावा अहवालानुसार राज्यात सरासरी 13.17 टक्के घर-यादी नोंदी प्रलंबित असताना गडचिरोली जिल्ह्यात 99.46 टक्के नोंदी पूर्ण झाल्या असून केवळ 14 घर-यादी गटातील नोंदी, म्हणजेच 0.54 टक्के काम शिल्लक आहे. त्यामुळे घर-यादी गणनेत गडचिरोली जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय प्रगती नोंदवून आघाडीच्या जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविले आहे.
 

Gadchiroli census progress, house listing exercise Maharashtra 
अहवालानुसार राज्यात एकूण 29 हजार 38 घर-यादी नोंदी प्रलंबित आहेत. बृहन्मुंबई (43.08 टक्के), पुणे महानगरपालिका (38.24 टक्के), नंदुरबार (37.01 टक्के), लातूर (35.74 टक्के) आणि ठाणे (28.05 टक्के) या भागांमध्ये प्रलंबित नोंदींचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. याउलट नक्षलग्रस्त, वनबहुल आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात प्रलंबित नोंदींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीचे आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे प्रतिबिंब दिसून येत आहे.
जनगणना 2027 अंतर्गत 14 जून 2026 पर्यंत घर-यादी गणनेचे काम सुरू राहणार आहे. जनगणना ही भारत सरकारच्या जनगणना अधिनियम, 1948 अंतर्गत राबविण्यात येणारी कायदेशीर आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची प्रक्रिया आहे. या अधिनियमाअंतर्गत प्रत्येक नागरिकाने जनगणना कर्मचार्‍यांना आवश्यक माहिती अचूकपणे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. जनगणना कामात अडथळा आणणे यासाठी अधिनियमात दंडात्मक तरतुदी आहेत. जनगणनेसाठी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते व तिचा वापर केवळ सांख्यिकीय, प्रशासकीय आणि विकास नियोजनांच्या उद्देशानेच केला जातो.
जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, गृहनिर्माण, सामाजिक कल्याण योजना तसेच विविध विकास प्रकल्पांचे नियोजन आणि निधीचे वाटप करण्यात येते. त्यामुळे अचूक आणि सर्वसमावेशक जनगणना ही देशाच्या विकास प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
 
 
याबाबत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, जनगणना ही राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे. प्रत्येक नागरिकाने जनगणना कर्मचार्‍यांना सहकार्य करून अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी. जनगणना कार्यास असहकार्य करणे अथवा आवश्यक माहिती देण्यास टाळाटाळ करणे हे राष्ट्रीय कर्तव्याच्या पूर्ततेत अडथळा निर्माण करणारे आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा.
 
 
घर-यादी गणना पूर्ण होण्यासाठी आता केवळ काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. ज्या घरांची नोंदणी अद्याप झालेली नाही किंवा ज्या कुटुंबांपर्यंत गणनाकर्मी पोहोचू शकलेले नाहीत, त्यांनी संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.