उरीतील ग्रेनेड स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान हुतात्मा

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
उरी,
grenade blast in Uri
श्रीनगरजवळ जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान हुतात्मा झाले आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणारे हे दोन्ही जवान महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने राज्यातही शोककळा पसरली आहे.हुतात्मा झालेल्यांमध्ये नवी मुंबईतील ऐरोली येथील जवान विक्रम चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शाहपूर येथील जवान अर्जुन जाधव यांचा समावेश आहे. कर्तव्य बजावताना झालेल्या या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या गावांमध्ये शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
grenade blast in Uri  
 
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी कमलकोट परिसरात भारतीय लष्कराचे जवान नियमित गस्त घालत असताना अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की दोन्ही जवान गंभीर जखमी झाले. सहकारी जवानांनी तातडीने बचावकार्य करत त्यांना श्रीनगरमधील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र उपचारादरम्यान दोघांचीही प्राणज्योत मालवली.या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार भूसुरुंगाचा स्फोट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र दहशतवादी कारवाईचा संबंध आहे का याचाही लष्कराकडून सखोल तपास सुरू आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
 
 
या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातही मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. विक्रम चव्हाण यांच्या ऐरोली येथील घरात शोकाकुल वातावरण असून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तर शाहपूर गावात अर्जुन जाधव यांच्या निधनाने ग्रामस्थ शोकसागरात बुडाले आहेत. देशसेवेसाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.दोन्ही हुतात्मा जवानांचे पार्थिव लष्करी इतमामात त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार असून पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.