होर्मुझच्या लाटांतून उसळली युद्धाची ज्वाला!

इराण-अमेरिका संघर्षाने मध्य पूर्व हादरला

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
तेहरान,
Iran-US conflict मध्य पूर्वेतील तणाव आता धोकादायक वळणावर पोहोचला असून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष उघड लष्करी चकमकीत बदलल्याचे चित्र दिसत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरात वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने बहरीन, कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोन व बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ले केल्याचा दावा केला आहे. या घटनांमुळे संपूर्ण आखात क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक देशांनी हवाई संरक्षण यंत्रणा सतर्क केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन तळांच्या दिशेने अनेक ड्रोन आणि किमान चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यानंतर विविध ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
Iran-US conflict
 
 
अमेरिकेने इराणमधील काही लष्करी आणि निगराणी केंद्रांवर केलेल्या कारवाईनंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे मानले जात आहे. दक्षिण इराणातील जास्क, सिरिक आणि केशम बेट परिसरातील रडार व हवाई संरक्षण यंत्रणांवर अमेरिकेने हल्ले केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर इराणने प्रत्युत्तरात्मक कारवाईची घोषणा केली.बहरीनमध्ये अमेरिकेच्या पाचव्या नौदल ताफ्याच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा आयआरजीसीने केला आहे. पहाटेच्या सुमारास ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे. काही वृत्तांनुसार, एक क्षेपणास्त्र अमेरिकन तळाजवळ कोसळल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर बहरीन प्रशासनाने देशभरात इशारा देणारे सायरन वाजवून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. अनेक भागांत स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. मात्र, अमेरिकेकडून कोणत्याही मोठ्या नुकसानीची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
 
 
दरम्यान, कुवेतमधील अली अल सालेम हवाई तळालाही लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकन हवाई दलासाठी महत्त्वाचा मानला जाणारा हा तळ इराणी ड्रोनच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले जात आहे. कुवेती लष्कराने आपल्या हवाई संरक्षण प्रणालीने संशयित हवाई लक्ष्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. देशातील अनेक भागांत स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जॉर्डनमध्येही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. जॉर्डनच्या लष्कराने आपल्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणारी पाच क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे. या कारवाईत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही अवशेष जॉर्डनच्या भूभागावर पडल्याचे सांगण्यात आले. देशाची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी लष्कर पूर्ण सज्ज असल्याचे जॉर्डन सरकारने स्पष्ट केले आहे.
 
 
इराणच्या आयआरजीसीने आखातातील तब्बल २१ अमेरिकन हवाई व नौदल तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने इराणविरोधी कारवाया सुरू ठेवल्यास आणखी तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेने आखातातील आपली लष्करी उपस्थिती कमी करावी, अन्यथा प्रत्येक कारवाईला कठोर उत्तर दिले जाईल, असे स्पष्ट केले आहे.या वाढत्या संघर्षामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत अस्थिरता निर्माण झाली असून संपूर्ण जगाचे लक्ष आता मध्य पूर्वेकडे लागले आहे. परिस्थिती आणखी चिघळल्यास त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा बाजारावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.