रत्नागिरी,
Khed drowning incident रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड शहर आणि भोस्ते गावाच्या सीमेवरून वाहणाऱ्या जगबुडी नदीतील खोल डोहात अंघोळीसाठी उतरलेल्या चार तरुणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक तरुण सुदैवाने बचावला आहे. ही घटना सोमवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, उकाड्यापासून दिलासा मिळावा आणि पोहण्याचा आनंद घेता यावा या उद्देशाने चार तरुण जगबुडी नदीच्या पात्रात उतरले होते. खेड शहर व भोस्ते गावाच्या दरम्यान असलेल्या एका खोल डोहाच्या ठिकाणी ते पोहत असताना पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. काही क्षणांतच चौघेही पाण्याच्या प्रवाहात अडकले आणि बुडू लागले.तरुणांनी मदतीसाठी आरडाओरड केली असली तरी खोल पाणी आणि प्रवाहाचा वेग अधिक असल्याने तिघे तरुण पाण्यात बेपत्ता झाले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे एका तरुणाला बाहेर काढण्यात यश आले असून तो सुरक्षित असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने धाव घेतली. या वेळी नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही मन हेलावले. परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. खेड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी स्थानिकांच्या मदतीने पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.नदी, डोह आणि धरणांसारख्या ठिकाणी अनेकदा नागरिक आणि तरुणांची गर्दी होते. मात्र पाण्याची खोली, प्रवाह आणि धोकादायक भाग यांचा अंदाज न आल्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.