हृदयद्रावक! बैल बनून शेतकरी महिलेने शेत नांगरले

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
लातूर
Latur farmer निसर्गाच्या अवकृपेने देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक गावातील एका गरीब शेतमजूर कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्यानंतर उपजीविकेचा आधारच हिरावल्याने कुटुंबाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. अशा कठीण परिस्थितीत काशिनाथ गायकवाड यांच्या पत्नीने शेतीची कामे थांबू नयेत म्हणून स्वतः पुढाकार घेत खांद्यावर जू घेतल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधी तत्काळ मदतीला धावले.
 
 

Latur farmer woman ploughing field 
५ जून रोजी झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज कोसळून काशिनाथ गायकवाड यांचा एकमेव बैल मृत्युमुखी पडला. भूमिहीन शेतमजूर असलेल्या गायकवाड कुटुंबाचा उदरनिर्वाह इतरांच्या शेतीवर मजुरी करून होत असून बैल हे शेतीसाठीचे मुख्य साधन होते. बैलाच्या मृत्यूनंतर पेरणीच्या हंगामात शेतीची कामे ठप्प होण्याची वेळ आल्याने कुटुंबासमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले.
 
 
या पार्श्वभूमीवर Latur farmer  पत्नीने स्वतः नांगराला जुंपून शेतीचे काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दृश्य समाजमाध्यमांवर समोर आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लातूर जिल्हा प्रशासनाला आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि तहसील प्रशासनाने हालचाली सुरू करत परिस्थितीची पाहणी केली.देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी गायकवाड कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत तातडीने ३२ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. तसेच स्थानिक गोशाळेतून एक बैल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हक्क फाउंडेशनकडून २० हजार रुपयांची अतिरिक्त मदत देण्यात आली.प्रशासनाने कोणताही गाजावाजा न करता सकाळी सुमारे सात वाजता गोशाळेतून आणलेला बैल थेट शेतात पोहोचवून गायकवाड कुटुंबाला सुपूर्त केला. या मदतीमुळे शेतीची थांबलेली कामे पुन्हा सुरू झाली असून कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या या तात्काळ हस्तक्षेपामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला आधार मिळाल्याचे चित्र आहे.
 
 
दरम्यान, या घटनेने ग्रामीण Latur farmer भागातील अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांची निसर्गावरची अवलंबित्वाची तीव्रता पुन्हा अधोरेखित केली आहे. एका बैलाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडल्याची परिस्थिती ही शेतीव्यवस्थेतील असुरक्षिततेचे वास्तव दाखवणारी ठरली आहे.