रेल्वेच्या धडकेत बिबट्याच्या मृत्यू

*राजुरा वनपरिक्षेत्राचे नलफडी बिटातील घटना

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
राजुरा, 
leopard-dies-hit-by-a-train : राजुरा वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या नियत क्षेत्र नलफडी येथील कक्ष क्रमांक 179 मधून गेलेल्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे डाउन लाईन, पोल क्रमांक 155/41 जवळ 9 जून रोजी रात्री सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास एका तीन महिन्याच्या बिबट्याचा रेल्वची धडक बसून मृत्यू झाला.
 
 

KJ 
 
 
 
रेल्वे कर्मचार्‍यांकडून घटनेची माहिती प्राप्त होताच वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या ठिकाणाचे जीपीएस स्थान नोंदविण्यात आले आहे. मृत बिबटाच्या बछड्याच्या शरीराची तपासणी करण्यात आली असता त्याची लांबी 51 सेमी, शेपटीची लांबी 31 सेमी, मागील व समोरील पायांची लांबी प्रत्येकी 16 सेमी तसेच छातीचा घेर 26 सेमी असा आढळून आला. शवविच्छेदनासाठी संबंधित अधिकार्‍यांमार्फत प्रक्रिया राबविण्यात आली. या बछड्याचे शवविच्छेदन पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. एन. पी. तेलंगे यांच्यामार्फत करण्यात आले. त्यानंतर वन विभागाच्या नियमांनुसार व उपस्थित अधिकार्‍यांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले. प्राथमिक तपासणी व शवविच्छेदन अहवालानुसार या बछड्याला रेल्वे गाडीच्या जोरदार धडकेत गंभीर दुखापत झाली व त्यातून निर्माण झालेल्या न्यूरोलॉजिकल शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
 
बल्हारशाह ते काजीपेट हा मध्य दक्षिण रेल्वे मार्ग राजुरा तालुक्यातील घनदाट जंगलातून जातो. या जंगलात वाघ बिबट, अस्वल आदी वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु, वनभ्रमंती करताना वनप्राण्यांना रेल्वे ट्रँक वरून ओलांडून जावे लागते. अशातच कळतनकळत रेल्वेची धडक बसून त्यांचा नाहक जीव जात आहे. आतापर्यंत 11 पेक्षा अधिक वन्यजीवाचा रेल्वेच्या धडकेत जीव गेला आहे. घटना घडली की रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी यांची यावर उपाययोजना करण्यासाठी बैठक होते. परंतु प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. या रेल्वे मार्गावर तात्काळ उपाययोजना करण्याकरिता वनविभागाने पुढाकार घेऊन तसा प्रस्ताव राज्य व केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.