कर प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर प्राणघातक हल्ला

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
अहेरी
Vaibhav Pandhare अहेरी नगर पंचायतीचे कर व प्रशासकीय अधिकारी वैभव सुभाष पांढरे (34) यांच्यावर आज सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान चार इसमांनी पूर्ववैमनस्यातून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पांढरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आरोपी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार (45), पिंटू मडावी (35) आणि अजय नैताम (35) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी अनोळखी आहे. या सर्व आरोपींच्या शोधासाठी 3 पोलिस पथके रवाना करण्यात आले आहे.
 

Vaibhav Pandhare  
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव पांढरे हे नेहमीप्रमाणे आज 10 जून रोजी सकाळी 6.45 वाजताच्या सुमारास इंदाराम रोडने मॉर्निंग वॉक करत होते. दरम्यान, अबनपल्ली फाटा ते चेरपल्ली फाटा दरम्यान प्रशांत भागवत यांच्या शेताजवळ मागून आलेल्या पांढर्‍या रंगाच्या ‘महिंद्रा बोलेरो’ (क्र. एमएच-33-8989) गाडीतून आलेल्या तीन जणांनी त्यांना अडवले.
गाडीतून उतरलेले आरोपी अजय कंकडालवार, त्याचा अंगरक्षक पिंटू मडावी आणि अजय नैताम यांनी वैभव पांढरे यांना अचानक हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली व त्यांना जमिनीवर दाबून धरले. पांढरे यांनी या मारहाणीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, मुख्य आरोपी अजय कंकडवार याने गाडीत असलेला लाकडी दांडा आणून पांढरे यांच्या डोक्यावर, कपाळावर आणि डाव्या हाताच्या बाहीवर जोरदार प्रहार केले.लाकडी दांड्याचा जबर मार लागल्यामुळे पांढरे यांच्या कपाळातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला, तरीही आरोपींनी त्यांना मारहाण करणे सुरूच ठेवले. पांढरे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.
या घटनेमुळे गडचिरोली Vaibhav Pandhare जिल्ह्यातील शासन व प्रशासन हादरून गेले असून सर्वत्र घटनेचा निषेध केला जात आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये उद्यापासून बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शासकीय कर्मचार्‍यांवर जर असे हल्ले होत असतील तर शासकीय कर्मचारी सुरक्षित कसे राहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या नेतृत्वात सुरु आहेत.
 
 

ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीमुळे वाचले प्राण
हा थरारक प्राणघातक हल्ला झाल्यावर त्या मार्गावरून ड्रायव्हिंग स्कूलची गाडी येत असल्याचे पाहून आरोपींनी पांढरे यांना सोडले आणि घटनास्थळावरून गाडीसह पळ काढला. त्यानंतर जखमी पांढरे यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीचा आसरा घेतला आणि थेट अहेरी पोलिस स्टेशन गाठले.
 
 
कायदेशीर कारवाईची मागणी
नगर पंचायतीअंतर्गत बेकायदेशीर अतिक्रमणे व बेधडक बांधकामे पाडल्याच्या रागातून आणि मनात पूर्ववैमनस्य धरूनच आपल्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे वैभव पांढरे यांनी आपल्या बयाणात म्हटले आहे. डोक्याला गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या अजय कंकडालवार, पिंडू मडावी आणि अजय नैताम यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.