जो रूटला फटका, शुभमन गिलचा झटका!

आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे बदल

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
icc-rankings : यावेळी आयसीसी क्रमवारीत लक्षणीय बदल दिसून येत आहे. विशेष म्हणजे, दीर्घकाळ अव्वल स्थानी असलेल्या इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रूटने आपले स्थान गमावले आहे. तो मोठ्या प्रमाणात खाली घसरला आहे. हॅरी ब्रूक अव्वल कसोटी फलंदाज बनला आहे. दरम्यान, भारतीय कर्णधार शुभमन गिलनेही मोठी झेप घेतली आहे. तर दुसरीकडे, भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वालला किंचित नुकसान झाले आहे.
 
 
gill
 
 
इंग्लंडचा हॅरी ब्रूक आता आयसीसीचा अव्वल कसोटी फलंदाज बनला आहे. एका स्थानाने वर येत त्याचे रेटिंग आता ८६९ झाले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य फलंदाज, ट्रॅव्हिस हेडनेही एका स्थानाने झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याचे नवीनतम रेटिंग ८५३ आहे. जो रूट दोन स्थानांनी खाली घसरून आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. रूटचे रेटिंग ८५१ पर्यंत घसरले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात रूटची कामगिरी खराब होती. तो पहिल्या डावात एका धावेवर आणि दुसऱ्या डावात आठ धावांवर बाद झाला, ज्यामुळे या वर्षीच्या क्रमवारीत त्याचे नुकसान झाले.
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ चौथ्या क्रमांकावर कायम आहे. श्रीलंकेचा कामेंदू मेंडिस एका स्थानाने पुढे जात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. केन विल्यमसनचीही एक स्थानाने घसरण झाली असून तो सहाव्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग आता ७८० आहे. केन अलीकडे धावा करत नाहीये. टेंबा बावुमा सातव्या क्रमांकावर कायम आहे.
दरम्यान, भारतीय कर्णधार शुभमन गिलने दोन स्थानांची झेप घेत आता आठवा क्रमांक पटकावला आहे. त्याचे रेटिंग ७४३ पर्यंत वाढले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातील शुभमन गिलच्या प्रभावी १२६ धावांच्या खेळीमुळे त्याला चालना मिळाली आहे. यशस्वी जैस्वाल एका स्थानाने घसरून नवव्या क्रमांकावर आला आहे. श्रीलंकेचा दिनेश चंडीमल एका स्थानाने पुढे जात दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.