नेहरूंचा विक्रम मोडत मोदींची ऐतिहासिक झेप!

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Modi's historic leap पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून त्यांनी माजी पंतप्रधान Jawaharlal Nehru यांचा विक्रम मागे टाकला आहे. २०१४ मध्ये प्रथमच पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदी यांनी आता सलग ४,३९९ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला असून हा विक्रम देशाच्या राजकीय इतिहासात नोंदवला गेला आहे.२०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवत मोदी यांनी केंद्रातील सत्तेवर आपले वर्चस्व कायम ठेवले. ९ जून २०२४ रोजी त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.
 
 

Modi 
या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर संदेश देत जनसेवेलाच सुशासनाची खरी कसोटी असल्याचे म्हटले. विनम्रता, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावरच जनतेचा विश्वास संपादन करता येतो, असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले. मोदी यांच्या या विक्रमी कामगिरीबद्दल देश-विदेशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध देशांच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनीही पत्राद्वारे अभिनंदन करत मोदी यांच्या नेतृत्वाचा भारताच्या विकास आणि जागतिक प्रतिमेवर मोठा प्रभाव पडल्याचे नमूद केले.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मोदी यांचे अभिनंदन करत हा विक्रम देशवासियांच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे म्हटले. दरम्यान, केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अनेक ठिकाणी विशेष पूजा-अर्चना आणि अभिनंदन समारंभ होणार आहेत. सामान्य कुटुंबातून राजकारणात आलेल्या मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कार्यकर्त्यापासून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत आणि त्यानंतर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास केला. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधा विकास, डिजिटल व्यवहारांचा विस्तार, आत्मनिर्भर भारत अभियान आणि विविध धोरणात्मक निर्णयांमुळे भारताच्या राजकीय व आर्थिक वाटचालीत महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे समर्थकांचे मत आहे.