महापौरांना बॉम्बस्फोटाची धमकी

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
मुंबई
Ritu Tawade मुंबई महापालिकेत महापौर रितू तावडे यांना जीवे मारण्याची तसेच त्यांच्या कार्यालयात आणि अधिकृत वाहनात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पुणे महापालिकेनंतर आता मुंबईतही अशीच धमकी मिळाल्याने दोन्ही शहरांतील पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 

Ritu Tawade  
 
 
अज्ञात इसमाने पाठवलेल्या या ई-मेलमध्ये महापौरांच्या गाडीला आणि महापालिका मुख्यालयातील त्यांच्या केबिनला स्फोटकांनी उडवून देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिली.या गंभीर घटनेची दखल घेत मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि सायबर सेलने तपास सुरू केला आहे. ई-मेल पाठवण्यासाठी वापरलेला आयपी अ‍ॅड्रेस आणि डिजिटल पुरावे यांचा तांत्रिक तपास करण्यात येत आहे. धमकीमागील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
 
 
दरम्यान, खबरदारीचा उपाय Ritu Tawade म्हणून महापालिका मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. प्रवेशद्वारांवर वाहनांची आणि व्यक्तींची काटेकोर तपासणी केली जात असून महापौरांच्या कार्यालयाबाहेर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या हालचाली आणि दौऱ्यांदरम्यानही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमहापौर संजय घाडी यांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगत पोलिसांनी तातडीने तपास करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. धमकी खोडसाळपणातून आली आहे की यामागे काही मोठा हेतू आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेलाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. त्या घटनेनंतरही मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे महापालिका सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.