शेकडो आधारकार्डांचा गूढ गठ्ठा नागपुरात

एकाच पत्त्यावर देशभरातील कार्डांची डिलिव्हरी!

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Aadhaar scam, नागपुरातील शंकरनगर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने सायबर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची शेकडो आधारकार्डे एकाच पत्त्यावर पोहोचल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणामागे सायबर गुन्हेगारांचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, अनेक आधारकार्डांवर एकच मोबाईल क्रमांक नमूद असल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
 

Nagpur Aadhaar scam, fake Aadhaar cards case 
अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर येथील एका बहुमजली इमारतीत राहणाऱ्या नागरिकाच्या घरी काही दिवसांपूर्वी पोस्टमनने एक मोठा गठ्ठा पोहोचविला. सुरुवातीला सामान्य टपाल समजून तो गठ्ठा स्वीकारण्यात आला. मात्र, उघडून पाहताच घरमालकाच्या पायाखालची जमीनच सरकली. गठ्ठ्यात विविध राज्यांतील व्यक्तींच्या नावांची आधारकार्डे होती. त्यात कोलकाता, आसाम, मणिपूर आणि इतर राज्यांतील नागरिकांचाही समावेश असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, कार्डधारकांची नावे आणि मूळ पत्ते वेगवेगळे असले तरी सर्व आधारकार्डांवर शंकरनगरातील एकाच घराचा पत्ता नोंदविण्यात आला होता. संभाव्य गैरप्रकाराचा Aadhaar scam
अंदाज येताच संबंधित नागरिकाने तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. सायबर पोलिसांनी आधार कार्डांचा प्राथमिक तपास केला असता अनेक कार्डांवर एकच मोबाईल क्रमांक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा प्रकार तांत्रिक चूक नसून नियोजनबद्ध सायबर फसवणुकीचा भाग असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बँक खाती उघडण्यासाठी कट?
सायबर गुन्हे शाखेच्या सूत्रांनुसार, अशा प्रकारे बनविण्यात आलेल्या किंवा चुकीच्या पत्त्यावर नोंदविलेल्या आधारकार्डांचा वापर करून बँकांमध्ये बनावट खाती उघडली जाऊ शकतात. या खात्यांमधून ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम वळती केली जाते. तसेच एटीएम कार्ड मिळवून रोख रक्कम काढण्याचे प्रकारही घडू शकतात. त्यामुळे या प्रकरणाचा संबंध मोठ्या आर्थिक सायबर गुन्ह्यांशी असण्याची शक्यता तपासली जात आहे.
 
 
अनेक गैरप्रकारांची शक्यता
अशा आधारकार्डांचा वापर करून बोगस बँक खाती उघडणे, कर्ज मिळविणे, शासकीय योजनांचा लाभ घेणे किंवा इतर ओळखपत्रे तयार करणे शक्य असते. निवडणुकीच्या काळात बोगस मतदार ओळखपत्रे तयार करण्यासाठीही अशा पद्धतीचा गैरवापर होऊ शकतो. तसेच आधार नोंदणी प्रक्रियेदरम्यान डेटा एंट्रीतील गंभीर त्रुटीची शक्यताही पूर्णपणे नाकारता येत नाही.
 
 
नागपूर सायबर गुन्हेगारांसाठी ‘नंदनवन’?
गेल्या काही वर्षांत नागपुरात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विविध राज्यांतील दस्तऐवज एकाच पत्त्यावर पोहोचण्याच्या या प्रकारामुळे नागपूरचा वापर सायबर गुन्हेगारांकडून केंद्रस्थान म्हणून केला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या गूढ आधारकार्ड प्रकरणामुळे नागपुरातील सायबर सुरक्षा यंत्रणांसमोर नवे आव्हान उभे राहिले असून, तपासातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
“शेकडो आधारकार्डे एकाच पत्त्यावर आली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या कार्डांचा नेमका उद्देश काय होता, त्यामागे कोण आहे आणि त्यांचा वापर कशासाठी केला जाणार होता, याचा सखोल तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.”
– सुधीर बोरकुटे, पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा