नवी दिल्ली,
NDA Women Cadets Lieutenant भारतीय सैन्याच्या इतिहासात एक अभूतपूर्व अध्याय जोडला जाणार असून राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्स प्रथमच भारतीय लष्करी अकादमीमधून पदवी प्राप्त करून थेट लेफ्टनंट म्हणून सैन्यात रुजू होणार आहेत. १३ जून रोजी डेहराडून येथे होणाऱ्या पासिंग आउट परेडमध्ये या महिला कॅडेट्स पुरुष कॅडेट्सच्या खांद्याला खांदा लावून संचलन करतील. या ऐतिहासिक तुकडीत सुमारे आठ ते नऊ महिला कॅडेट्सचा समावेश असून, त्यांनी प्रशिक्षणातील सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. या सर्व अधिकाऱ्यांची निवड कठोर शारीरिक, मानसिक आणि लष्करी निकषांवर आधारित प्रशिक्षण प्रक्रियेतून झाली आहे. या प्रशिक्षणादरम्यान त्यांनी युद्धकौशल्य, जंगलातील जगण्याची कला, शारीरिक क्षमता आणि सामरिक निर्णयक्षमता यांसारख्या सर्व आव्हानात्मक टप्प्यांना पुरुष कॅडेट्सप्रमाणेच सामोरे जाऊन यश मिळवले आहे.

आयएमएमधील प्रशिक्षण हे पूर्णतः समान निकषांवर आधारित असून महिला व पुरुष कॅडेट्सना एकसारखेच कठोर प्रशिक्षण दिले जाते. या महिला कॅडेट्सनी सर्व लष्करी परीक्षा आणि प्रशिक्षणाचे टप्पे पार करून अधिकारी बनण्याची पात्रता सिद्ध केली आहे. त्यामुळे आता त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर थेट नियुक्त होणार आहेत.या ऐतिहासिक परेडला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार असून त्या नव्या अधिकाऱ्यांना संबोधित करतील. हा क्षण केवळ भारतीय सैन्यात महिलांच्या वाढत्या सहभागाचे प्रतीक नसून सशस्त्र दलांमध्ये समान संधी आणि बदलत्या परंपरेचेही द्योतक मानला जात आहे. या महिला अधिकाऱ्यांची यशस्वी वाटचाल भविष्यातील अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरणार असून भारतीय सैन्याच्या इतिहासात एक नवा मैलाचा दगड म्हणून या घटनेची नोंद होणार आहे.