इस्लामाबाद,
Pakistan helicopter crashes पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादजवळ पाकिस्तानी लष्कराच्या एमआय-17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. उड्डाण करत असतानाच तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती असून, त्यामधील सर्व लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फराबाद परिसरातील नीलम खोऱ्यात हे हेलिकॉप्टर नियमित मोहिमेवर होते. उड्डाणानंतर काही वेळातच हेलिकॉप्टरमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. अपघाताची माहिती मिळताच लष्कर आणि आपत्कालीन बचाव पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली.
पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने (आयएसपीआर) या दुर्घटनेला दुजोरा दिला असून, अपघातामागे तांत्रिक कारणे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हेलिकॉप्टरमध्ये नेमके किती जवान होते, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. काही वृत्तांनुसार, हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह अनेक सैनिक प्रवास करत होते.दरम्यान, अपघातानंतर संपूर्ण परिसर सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतला असून, दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. मृत जवानांची ओळख पटविण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत पाकिस्तानच्या लष्करी विमान आणि हेलिकॉप्टर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी बलुचिस्तानमध्येही पाकिस्तानी लष्कराचे एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यानंतर आता मुझफ्फराबादमधील ही दुर्घटना घडल्याने पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.