कुनार,
Pakistan's air strike on Afghanistan अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असून पाकिस्तानी लष्कराने केलेल्या कथित हवाई हल्ल्यांमध्ये ११ निष्पाप मुलांसह १३ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले असून मृतांमध्ये महिला आणि वृद्धांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये आणखी कटुता निर्माण झाली आहे. अफगाण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी सीमेलगतच्या कुनार, खोस्त आणि पक्तिका या प्रांतांतील निवासी वस्त्यांवर बॉम्बहल्ले केले. हल्ल्यांमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
अफगाण सरकारने या कारवाईचा तीव्र निषेध करत पाकिस्तानवर देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. अफगाण प्रशासनाच्या मते, हल्ल्यांचे लक्ष्य दहशतवादी नव्हते, तर सामान्य नागरिक राहत असलेले भाग होते. त्यामुळे या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात मानवी जीवितहानी झाली आहे.अफगाण सरकारचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्याने रात्रीच्या वेळी सीमा ओलांडून हवाई हल्ले करत नागरिकांच्या घरांवर बॉम्बफेक केली. या हल्ल्यांमध्ये अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अशा प्रकारच्या कारवाया आंतरराष्ट्रीय कायदे आणि सार्वभौम राष्ट्रांच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोपही त्यांनी केला. या घटनेनंतर सीमावर्ती भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष पुन्हा एकदा या संवेदनशील सीमावादाकडे वेधले गेले आहे. पाकिस्तानकडून अद्याप या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी या घटनेमुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.