मुंबई
Prahar The Ujjwal Nikam Story जेष्ठ विधिज्ञ आणि देशातील अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये सरकारी पक्षाची प्रभावी बाजू मांडणारे उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट 7 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेता राजकुमार राव उज्ज्वल निकम यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार असून या घोषणेनंतर चित्रपटप्रेमी आणि बायोपिक रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावरून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. त्यांच्या माहितीनुसार, निर्माता दिनेश विजन आणि अभिनेता राजकुमार राव यांची यशस्वी जोडी पुन्हा एकदा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकत्र आली आहे. त्यामुळे चित्रपटाबाबतची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
देशाच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या आणि संवेदनशील खटल्यांशी उज्ज्वल निकम यांचे नाव जोडले गेले आहे. विशेषतः 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातील खटल्यात त्यांनी सरकारी पक्षाचे प्रतिनिधित्व करत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर इतर अनेक गाजलेल्या प्रकरणांचा संदर्भही या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.चित्रपटाच्या कलाकारांबाबतही मोठी उत्सुकता आहे. राजकुमार राव यांच्यासोबत अभिनेत्री वामिका गब्बी, अभिनेता सिकंदर खेर आणि जयदीप अहलावत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश अरुण करत असून वास्तववादी आणि आशयघन कथा प्रभावीपणे पडद्यावर सादर करण्यासाठी ते ओळखले जातात.
उज्ज्वल निकम यांचे व्यक्तिमत्त्व साकारण्यासाठी राजकुमार राव यांनी विशेष मेहनत घेतल्याचे सांगितले जात आहे. भूमिकेच्या तयारीदरम्यान त्यांनी वजन वाढवले असून पात्राशी साधर्म्य साधण्यासाठी आपल्या लूकमध्येही आवश्यक बदल केले आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारच्या प्रोस्थेटिक मेकअपचा आधार न घेता त्यांनी ही भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या काही वर्षांत बायोपिक चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळवले आहे. त्यामुळे ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’कडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. आता राजकुमार राव यांच्या अभिनयातून उज्ज्वल निकम यांचा संघर्ष, कार्य आणि न्यायालयीन कारकीर्द किती प्रभावीपणे उभी राहते, याकडे चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.