मराठी चित्रपट राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा

-प्रवीण तरडेंची ठाम भूमिका -दै. तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
नागपूर,
pravin-tarde : मराठी चित्रपटसृष्टी मुंबई आणि पुण्यापुरती मर्यादित राहण्याची प्रथा मोडून काढण्याची गरज आहे. प्रत्येक मराठी सिनेमा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचलाच पाहिजे. यापुढे प्रत्येक चित्रपटाचे प्रीमियरही राज्याच्या इतर भागांत घेणार असल्याची ठाम भूमिका प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली.
 
 
 
tarde
 
 
 
‘देऊळबंद 2’ चित्रपटाच्या निमित्ताने नागपूर दौऱ्यावर आलेल्या तरडे यांनी दै. तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट देत मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी, विदर्भातील प्रेक्षक, चित्रपट उद्योगातील बदलते प्रवाह आणि सामाजिक जबाबदारी यांवर परखड मते मांडली. निर्माते कैलास वाणी यांच्यासह साऊंड इंजिनिअर संकेत धोटकर, अभिनेते मुकुंद वसुले यावेळी उपस्थित होते.
 
 
तरडे म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीतील निर्णयप्रक्रिया प्रामुख्याने मुंबई-पुण्यात केंद्रित झाल्याने राज्याच्या इतर भागांतील कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक दुर्लक्षित राहतात. नागपूरसह विदर्भातील प्रेक्षक चित्रपटांविषयी सजग आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करून प्रत्येक मराठी चित्रपट नागपूर, विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित व्हावा यासाठी चळवळ उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच या चित्रपटातून मिळविलेला निव्वळ नफा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
 
 
...तर लोक चित्रपटांना उन्ह दाखवतील
 
 
चित्रपट निर्मिती क्षेत्रातील बदलांवर भाष्य करताना ते म्हणाले, पूर्वी एकल निर्मात्यांच्या माध्यमातून चित्रपटांची निर्मिती होत असे. आता मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून चित्रपट तयार होत असल्याने अनेकदा केवळ नफ्याचाच विचार केला जातो. या कंपन्या मुंबई-पुण्यात केंद्रित असल्यामुळे बाहेरील कलाकार आणि तंत्रज्ञांना अपेक्षित संधी मिळत नाही. पण यापुढे नागपूरच्या उन्हाला घाबरून येथील कलाकारांना डावलले, तर इथले लोक सिनेमांना उन्ह नक्तीच दाखवतील, असे ते म्हणाले.
 
 
संघसंस्कारातून राष्ट्रभान जपणाऱ्या चित्रपटांची प्रेरणा
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम केल्याचा उल्लेख करताना तरडे म्हणाले, नागपूर हे संघ स्वयंसेवकांसाठी तीर्थक्षेत्रासारखे आहे. आपण सगळे एका संघ परिवाराचे आहोत. जात-पात बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र येणे आज देशासाठी आवश्यक आहे. संघ संस्कारांमुळेच राष्ट्रभान जपणारे चित्रपट करण्याच्या भावनेतून मी या क्षेत्रात आल्याचे ते यावेळी म्हणाले. काही विषयांवर ठाम भूमिका घेतल्यामुळे डाव्या विचारसरणीच्या माध्यमांकडून टीका झाली. मात्र, आपल्या विचारांशी तडजोड न करता आपण काम सुरू ठेवले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.