पुणे,
Pune Legislative Council election विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे मतदारसंघातील राजकीय घडामोडींनी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आणले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने उमेदवार मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असून, या निर्णयामुळे पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
महाविकास आघाडीच्या समन्वयानुसार पुणे विधानपरिषद मतदारसंघाची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली होती. या जागेवर श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र ऐनवेळी पक्षाने माघार घेतल्याने त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि निवडणूक बिनविरोध झाली. या निर्णयामागे महायुतीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ तसेच संभाव्य राजकीय डावपेचांचा विचार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या प्रक्रियेत समन्वय राखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये थेट संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी मागे घेण्याबाबत विनंती केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः श्रीकांत पाटील यांच्याशी संवाद साधल्याने हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील तणाव टळला असला तरी काँग्रेसमध्ये मात्र असंतोष वाढला आहे.
पुणे शहर काँग्रेसचे माजी Pune Legislative Council election अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया देत आपली नाराजी व्यक्त केली आहे. “महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचे नुकसान होत असेल तर काँग्रेसने स्वतंत्रपणे पुढे जाणे महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्रही पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे यांनी यावेळी घोडेबाजाराच्या मुद्द्यावरूनही प्रश्न उपस्थित केले. “घोडेबाजार होणार होता म्हणून माघार घेतली असे सांगितले जाते, पण फॉर्म भरताना ही शक्यता का लक्षात आली नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, निवडणूक प्रक्रियेतील निर्णयांवर आणि समन्वयावर त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.या संपूर्ण घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील जागावाटप आणि अंतर्गत समन्वयावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बिनविरोध निवडणुकीचा राजकीय फायदा जरी दिसत असला तरी काँग्रेसमधील नाराजीमुळे आघाडीतील तणाव पूर्णपणे संपलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.