नवी दिल्ली,
Rain alert for 17 states देशभरात मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असतानाच भारतीय हवामान विभागाने १७ राज्यांसाठी पुढील ७२ तासांचा विशेष इशारा जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आणि बदलत्या हवामान प्रणालीमुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा धोका वाढला आहे. काही भागांत ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर आता देशाच्या इतर भागांकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने बिहार, झारखंड, राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच डोंगराळ भागांत भूस्खलन होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ११ जूननंतर वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असून १२ आणि १३ जूनपासून पावसाचा जोरही वाढू शकतो. काही भागांत धुळीची वादळे आणि गारपिटीची शक्यता नाकारता येत नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना विशेष खबरदारी घ्यावी तसेच नागरिकांनी आवश्यक नसल्यास मुसळधार पावसाच्या काळात घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.