रंगभूमी नागपूरने पटकावला सर्वोत्कृष्ट निर्मितीचा मान

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Rangbhumi Nagpur अमरावती येथे आयोजित विदर्भस्तरीय अद्वैत एकांकिका स्पर्धेत नागपूरच्या रंगभूमी चमूने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वोत्कृष्ट निर्मितीचा मान पटकावला. १२ एकांकिकांमधून ‘थ्री टू वन स्टार्ट’ या एकांकिकेने आपल्या प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर हा बहुमान मिळवला. या स्पर्धेत रंगभूमी चमूने विविध विभागांतही यश संपादन केले. शैल चौधरी यांना उत्कृष्ट दिग्दर्शक (द्वितीय क्रमांक), साक्षी गव्हाने आणि विशाल हाडगे यांना उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी द्वितीय क्रमांक, अक्षय खोब्रागडे यांना उत्कृष्ट प्रकाशयोजना विभागात प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच तृप्ती वालधूरकर आणि श्वेता गणवीर यांना उत्कृष्ट अभिनेत्री (उत्तेजनार्थ) पुरस्काराने गौरविण्यात आले.

Rangbhumi Nagpur 
 
मुग्धा पाथ्रटकर लिखित आणि शैल चौधरी दिग्दर्शित ‘थ्री टू वन स्टार्ट’ या एकांकिकेत दया, आदर, क्षमाशीलता आणि प्रामाणिकता हीच खरी कला असल्याचा संदेश देण्यात आला आहे. माणुसकीच्या माध्यमातून रंगदेवता कशी प्रसन्न होते, याचे प्रभावी चित्रण या एकांकिकेत करण्यात आले आहे. प्रभावी अभिनय, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजूंच्या बळावर या एकांकिकेने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. या एकांकिकेत ओमकार काळे, समर बोबडे, शशांक रहांगडाले, चित्तरंजन कावरे, सारंग टोपरे आणि श्रीपाद टोपरे यांनी विविध भूमिका साकारल्या. एकांकिकेचे नेपथ्य पुण्यशील लांबट यांनी, तर रंगभूषा व वेशभूषेची जबाबदारी श्रद्धा रोकडे यांनी सांभाळली.
सौजन्य: सारंग टोपरे, संपर्क मित्र