विमानफेऱ्यांमध्ये १ जुलैपासून कपात

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
reduction-in-flight-services : पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि विमान इंधनाच्या वाढत्या किमतींचा परिणाम यामुळे नागपूर विमानतळावरून होणाऱ्या विमानफेऱ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. १ जुलैपासून आणखी काही विमानसेवा बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
 

ngp 
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि इंडिगो या प्रमुख विमान कंपन्यांनी त्यांच्या सेवांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाची दिल्ली-नागपूर-दिल्ली मार्गावरील एआय-४१५ आणि एआय-४१६ ही विमाने १ जुलैपासून बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूरहून एअर इंडियाच्या एकूण विमानफेऱ्यांची संख्या केवळ दोनवर येणार आहे. दुसरीकडे, इंडिगोने बेंगळुरू-नागपूर मार्गावरील ६ ई - ६००३ आणि ६ ई - ९०९ या दोन विमानफेऱ्या रद्द केल्या आहेत. कंपनीने देशभरातील आपल्या नेटवर्कमधून आतापर्यंत सुमारे २० विमाने कमी केली असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर विमानतळावरून दररोज सुमारे ७८ विमानांची ये-जा होत होती. मात्र, विमान कंपन्यांच्या पुनर्रचनेच्या निर्णयामुळे ही संख्या आता ५० च्याही खाली आली आहे. यापूर्वी मुंबई, गोवा आणि हैदराबाद या मार्गांवरील सेवांमध्ये कपात झाली होती.
 
प्रवाशांनी फ्लाइटचे स्टेटस तपासावे
१ जुलै किंवा त्यानंतरच्या कालावधीसाठी तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांनी संबंधित विमान कंपनीच्या संकेतस्थळावर अथवा ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून आपल्या विमानसेवेची स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.