६५० मेट्रिक टन डीएपी खताचा राखीव साठा वितरणासाठी खुला

खरीप हंगामात शेतकर्‍यांना मोठा दिलासा

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
वाशीम,
fertilizer released for distribution खरीप हंगाम २०२६ मध्ये जिल्ह्यात सोयाबीन व कापूस पेरणीला वेग आला असून डीएपी खताची मागणी वाढत आहे. शेतकर्‍यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या विशेष मान्यतेने जिल्ह्यातील ६५० मेट्रिक टन डीएपी खताचा संरक्षित साठा खुला करण्यात आला आहे. हा साठा ११ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपासून वितरणासाठी उपलब्ध होणार आहे.
 

fertilizer released for distribution 
 
 
सदर खतसाठा महाराष्ट्र अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन , विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या अधिकृत गोदामांतून जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खत विक्रेत्यांकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे. तालुकानिहाय विचार करता कारंजा, मालेगाव, मंगरूळनाथ, रिसोड, वाशीम आणि मानोरा या सर्व तालुयांमध्ये खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकर्‍यांना या राखीव साठ्याचा लाभ समान प्रमाणात मिळावा यासाठी प्रशासनाने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. खत खरेदीसाठी ई-पॉस मशीनवर आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली असून शेतकर्‍यांनी आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. एका शेतकर्‍याला एका आधार क्रमांकावर जास्तीत जास्त ३ ते ४ गोण्या डीएपी खत देण्यात येणार आहे.
 
जिल्ह्यातील ४३ अधिकृत विक्रेत्यांमार्फत १३ हजार गोण्या खतसाठा वाटप होणार आहे. खत खरेदी करताना शेतकर्‍यांनी शासनाने निश्चित केलेल्या एमआरपी दराचे पक्के बिल घेणे बंधनकारक आहे.fertilizer released for distribution तसेच डीएपी खतासोबत इतर कोणतेही खत, बियाणे किंवा औषधे घेण्याची सक्ती विक्रेत्यांना करता येणार नसून अशा प्रकारच्या तक्रारी आढळल्यास कृषी विभागाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांना वेळेवर खत उपलब्ध व्हावे या उद्देशाने प्रशासनाने राखीव साठा खुला केला असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करावे, रांगेचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.