नागपूरच्या रस्त्यांवर ‘थकलेले स्टीअरिंग’!

- झोपेचा अभाव व कामाचा ताण वाढवतोय अपघातांचा धोका - चालकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष चिंताजनक

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
विधी शर्मा,
नागपूर,
road-accidents : शहराचा झपाट्याने विस्तार, वाढती प्रवासी वाहतूक आणि २४ तास सुरू असलेली प्रवास सेवा यामुळे नागपूरमधील व्यावसायिक वाहन चालकांवरील ताण वाढत चालला आहे. प्रवाशांना वेळेत सेवा देण्याच्या स्पर्धेत अनेक चालकांना पुरेशी विश्रांती मिळत नसल्याने थकवा आणि झोपेचा अभाव ही गंभीर समस्या बनली आहे. परिणामी रस्ते अपघातांचा धोका वाढत असल्याबाबत तज्ज्ञ आणि वाहतूक क्षेत्रातील जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे.
 
 
 
ngp
 
 
सौजन्य: AI
 
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलेल्या माहितीनुसार, देशातील ५८.३ टक्के व्यावसायिक वाहन चालकांना प्रवासादरम्यान थकवा किंवा झोपेचा अभाव जाणवतो. नागपूरसारख्या महत्त्वाच्या वाहतूक केंद्रासाठी ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे. शहरातून दररोज शेकडो खासगी बस, कर्मचारी वाहतूक वाहने, ट्रॅव्हल्स आणि पर्यटन वाहने विविध मार्गांवर धावत असतात.
 
नागपूर आणि विदर्भातील वाहतूक क्षेत्राशी संबंधित सूत्रांच्या मते, चालकांची कमतरता आणि वाढती व्यावसायिक स्पर्धा यामुळे अनेक चालकांना सलग तासन्‌तास वाहन चालवावे लागते. काही चालक एकापेक्षा अधिक वाहतूक संस्थांसाठी काम करतात. त्यामुळे एका दिवसात त्यांनी किती तास वाहन चालवले याची अचूक नोंद अनेकदा उपलब्ध नसते.
 
थकवा ठरतोय अपघातांचे प्रमुख कारण
 
 
आयआयटी मुंबईच्या संशोधनानुसार, पाच तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या चालकांचा अपघाताचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. दीर्घकाळ वाहन चालविल्यानंतर होणारा मानसिक आणि शारीरिक थकवा चालकांच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करतो. काही सेकंदांची डुलकीसुद्धा मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते.
 
 
चालकांच्या कामाच्या तासांवर स्वतंत्र नियम नाहीत
 
 
"व्यावसायिक वाहन चालकांच्या कामाच्या तासांबाबत स्वतंत्र नियमन अस्तित्वात नाही. मात्र, कामगार कायद्यांचे उल्लंघन झाल्यास संबंधित तक्रारींवर निश्चितच कारवाई केली जाऊ शकते."
- किरण बिडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपू
 
 
तज्ज्ञांच्या मते, वाहनांची तांत्रिक तपासणी जितकी महत्त्वाची आहे, तितकीच चालकांची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीही महत्त्वाची आहे. मात्र सध्या चालकांच्या थकव्याचे मोजमाप करणारी किंवा विश्रांतीची खात्री करणारी कोणतीही प्रभावी यंत्रणा अस्तित्वात नाही.
 
 
नागपूरसाठी चिंतेच्या बाबी
१. वाढती प्रवासी आणि कर्मचारी वाहतूक
२. चालकांची कमतरता आणि वाढता कामाचा ताण
३. कामाच्या तासांवर प्रभावी नियंत्रणाचा अभाव
४. थकवा आणि झोपेच्या कमतरतेमुळे अपघातांचा धोका
५. चालकांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा नाही
 
 
उपाययोजनांची गरज
१. चालकांसाठी किमान विश्रांतीचे निकष निश्चित करणे
२. कामाच्या तासांची डिजिटल नोंद ठेवणे
३. नियमित आरोग्य व झोप तपासणी
४. वाहतूक कंपन्यांवर अधिक देखरेख
५. चालकांमध्ये थकवा व्यवस्थापनाबाबत जागृती
वेगवान रस्त्यांपेक्षा सुरक्षित चालक अधिक महत्त्वाचे आहेत. नागपूरच्या रस्त्यांवरील सुरक्षित प्रवासासाठी आता वाहनांसोबतच स्टीअरिंगमागील व्यक्तीच्या आरोग्यालाही प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे.