मुंबई
Rupali Chakankar भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाशी आपला कोणताही आर्थिक संबंध नसल्याचे तसेच कोणत्याही जमीन व्यवहारात पार्टनरशिप नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. तसेच, कुठल्याही महिलेला खरात यांच्याकडे नेल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे.
चाकणकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये, गेल्या काही महिन्यांपासून आपल्यावर आणि कुटुंबावर सातत्याने बदनामीकारक आणि आक्षेपार्ह आरोप केले जात असल्याचा उल्लेख केला आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना अश्लील आणि अशोभनीय भाषेत आरोप करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणात आपली भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट असल्याचे सांगत, त्यांनी सांगितले की खरात प्रकरणाशी संबंधित कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा जमिनीच्या भागीदारीत आपला सहभाग नव्हता. तसेच, प्रसारित करण्यात आलेले काही व्हिडिओ आणि फोटो जुने Rupali Chakankar असून ते चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.दरम्यान, तपास प्रक्रियेला सहकार्य करण्याच्या उद्देशाने आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला होता, असेही त्यांनी नमूद केले. मात्र त्यानंतरही सोशल मीडियावर AI तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट व्हिडिओ तयार करत बदनामी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर आता बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काही व्यक्तींना नोटिसा पाठवण्यात आल्या असून, त्याचा स्वीकार न झाल्याने कोर्टाच्या माध्यमातून पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रकरणात काही व्यक्तींना 2 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, पुढील कायदेशीर घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.